‘पोलिसराज मुर्दाबाद,दडपशाही मुर्दाबाद’; विद्यापीठ प्रवेशद्वारावर विद्यार्थी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 02:59 PM2019-12-19T14:59:39+5:302019-12-19T15:02:16+5:30
औरंगाबाद शहरात सलग दोन दिवस विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी शैक्षणिक बंदचे आवाहन केले होते.
औरंगाबाद : जामिया इस्लामिया विद्यापीठात दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या विरोधात औरंगाबाद शहरात शैक्षणिक बंद पुकारण्यात आला होता. मात्र, शहरातील महाविद्यालयांमध्ये पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावून विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या. यामुळे विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जमा होऊन पोलिसांसह केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
केंद्र शासनाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी, नागरिक एकवटले आहेत. या विधेयकास विरोध करणाऱ्या जामिया इस्लामिया विद्यापीठात दिल्ली पोलिसांनी बेकायदा घुसखोरी करून विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला व अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्याशिवाय गोळीबारही करण्यात आला. या अत्याचाराचे पडसाद देशभरातील विद्यापीठांमध्ये पडले आहेत. औरंगाबाद शहरात सलग दोन दिवस विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी शैक्षणिक बंदचे आवाहन केले होते.
या विरोधात पोलिसांनी विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी सायंकाळीच नोटिसा देऊन शैक्षणिक बंद करण्यास परवानगी नाकारली होती. तसेच शहरातील देवगिरी, सरस्वती भुवन, मौलाना आझाद, विवेकानंद महाविद्यालयाच्या समोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मौलाना आझाद महाविद्यालय, रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, नागसेनवनातील महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रवेशद्वारावर जमा होण्याचे आवाहन केले. यास उत्तम प्रतिसाद मिळाला. शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रवेशद्वारावर एकत्र येऊन महाविद्यालयातील तासिका बंद पाडल्या. यामुळे वेगळ्या पद्धतीने शैक्षणिक बंद पाळण्यात आला.
विद्यापीठ प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी ‘पोलिसराज मुर्दाबाद, भारतीय संविधानाचा विजय असो, संघर्षो से आदी है हम आंबेडकरवादी है, संविधान के सन्मान में छात्रशक्ती मैदान में, एआरसी-सीएटी चलेजाव, संघवाद मुर्दाबाद, दडपशाही मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात एमआयएम विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पँथर्स रिपब्लिक विद्यार्थी आघाडी, एसएफआय, एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, स्टुडंटस् इस्लामिक आॅर्गनायझेशन, आझाद युवा ब्रिगेड, एसडीपीआय, मुस्लिम युथ फोरमने सहभाग नोंदविला.
ज्युबिली पार्क ते विद्यापीठगेट निषेध रॅली
नवखंडा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत निषेध रॅली काढली. यात विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यात महाविद्यालयांचे प्राध्यापकही सहभागी झाले होते. ज्युबिली पार्क, घाटी, पाणचक्कीमार्गे ही रॅली विद्यापीठ प्रवेशद्वारावर पोहोचली.