Maharashtra Police recruitment: 31 डिसेंबरपूर्वी पोलीस खात्यातील 5,200 पदे भरणार, गृहमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 06:29 PM2021-07-12T18:29:18+5:302021-07-12T18:31:24+5:30
Maharashtra Home Minister Dilip Walse Patil on Police recruitment: महाराष्ट्र पोलीस खात्यात एकूण 12,200 पदांची भरती होईल
औरंगाबाद: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस दलातील भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. ते सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार असून, पहिल्या टप्प्यातील 5,200 पदांची भरती 31 डिसेंबर पूर्वी केली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.
दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले, आज औरंगाबाद परिक्षेत्राची बैठक पार पडली. कायदा सुव्यवस्था परिस्थिती, गुन्हे दाखल होण्याचे आणि सिद्ध होण्याचे प्रमाण याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, कर्मचाऱ्यांना चांगली घरे चांगली सुविधा मिळाव्यात याबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तर, महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर तर, त्यानंतर उर्वरित 7 हजार पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
मृत कर्मचाऱ्याच्या मुलांना नोकरी
पोलीस दलातील भरतीसोबतच त्यांनी मृत पोलिसांच्या मुलांच्या नोकरीबाबतही मोठे वक्तव्य केले. कोविडमध्ये मृत्यू झालेल्या पोलिसांच्या मुलांना नोकरी देण्याचे धोरण त्यांनी यावेळी स्पष्ट आहे. तसेच, नुकसान भरपाई म्हणून 50 लाख देण्याचे काम बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाले असून, उर्वरित राहिलेल्यांनाही लवकर मदत दिली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय, पोलीस कर्मचाऱ्यांना कर्ज मिळत नाही. ते वाटप करण्याच्या दृष्टीने विचार केला जात असून, कर्जासाठी मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.