Aurangabad Violence : तीन हजार दंगलखोरांविरूद्ध पोलिसांनी नोंदविले सहा गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:45 AM2018-05-14T01:45:36+5:302018-05-14T11:04:28+5:30
शहरातील दंगलीप्रकरणी क्रांतीचौक, सिटीचौक आणि जिन्सी पोलीस ठाण्यात सुमारे तीन हजार दंगलखोरांविरुद्ध पोलिसांनी वेगवेगळे सहा गुन्हे नोंदविले
औरंगाबाद : शहरातील दंगलीप्रकरणी क्रांतीचौक, सिटीचौक आणि जिन्सी पोलीस ठाण्यात सुमारे तीन हजार दंगलखोरांविरुद्ध पोलिसांनी वेगवेगळे सहा गुन्हे नोंदविले. विविध गुन्ह्यांत पोलिसांनी आतापर्यंत ७० ते ८० संशयितांची धरपकड केली असून, पोलिसांनी अटक केलेल्या २३ जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली.
मोबाईल देण्या-घेण्यावरून गांधीनगरात ११ मे रोजी रात्री झालेल्या दोन गटातील वादाचे रूपांतर दंगलीत झाले. ११ रात्रीपासून सुरू झालेली दंगल १२ मे रोजी दुपारपर्यंत सुरूच होती. या दंगलीत गांधीनगर, नवाबपुरा, मोतीकारंजा, राजाबाजार, शहागंज, रोशनगेट आणि चंपाचौक येथे दोन समुदायातील शेकडो लोकांनी दगडफेक, जाळपोळ करीत हल्ले केले. एवढेच नव्हे तर जमावाने तेथील दुकाने आणि वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि लुटालूट केली. दंगलीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर राज्य राखीव दलाच्या सात कंपन्या, शीघ्र कृतिदल, दंगा काबू पथकाचे जवान आणि शहर पोलीस दलातील सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने रविवारी सकाळपासून शहर पूर्वपदावर आले. दहा ते बारा तास जुन्या शहरात दंगल करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली. शनिवारी शहर पोलिसांनी जिन्सी, सिटीचौक आणि क्रांंतीचौक ठाण्यांत वेगवेगळे पाच गुन्हे नोंदविले. सर्व गुन्ह्यांतील आरोपींची संख्या तीन हजारपेक्षा अधिक आहे.
चंपाचौकातील दंगलीप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा
चंपाचौकात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलीस नाईक जाहेद महेबुब सय्यद यांनी सरकार पक्षातर्फे तक्रार जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस अधिकारी कर्मचाºयांवर दगडफेक करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांखाली गुन्हा नोंदविला. जिन्सी पोलिसांनी शेख फरीद शेख महेबूब (३८, रा. रेंगटीपुरा), सय्यद फईम सय्यद रसूल (२३), मजहर अहेमद अब्दुल अजीज (३२), सय्यद नासीर सय्यद रशीद (२७), युसूफबीन अमर बागवान (१९, रा. लोटाकारंजा), शेख अब्दुल रहेमान शेख अब्दुल हाफीज (१९) आणि शेख वसीम शेख सलीम (२२, रा. टाइम्स कॉलनी) यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.
जिन्सी ठाण्यात रविवारी दुपारी राजाबाजार येथील हार्डवेअर दुकानाचे मालक मेमन यांनी तक्रार नोंदविली. जमावाने त्यांच्या दुकानाची जाळपोळ केली होती. गांधीनगरात झालेल्या दंगलीप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय बनकर यांनी सरकारपक्षातर्फे फिर्याद नोंदविली. या फिर्यादीत म्हटले की, दोन्ही समुदायाच्या सुमारे ४०० लोकांनी परस्परांवर लाठ्या, काठ्या, तलवारीने हल्ला चढविला. शांततेचे आवाहन करणा-या एसीपी गोवर्धन कोळेकर, पो. निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह अन्य पोलिसांवर दगडफेक करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दंगल करणे, शस्त्रबंदी, जमाव बंदीचे उल्लंघन करणे आदी कलमांखाली गुन्हे नोंदविले. सहायक पोलीस निरीक्षक विजय घेरडे हे तपास करीत असून, संशयितांना लवकरच अटक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिटीचौक पोलीस ठाण्यात दोन गुन्हे
राजाबाजार, मोतीकारंजा, शहागंज आणि चंपा चौक येथे दगडफेकीत गंभीर जखमी झालेले पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार, जमावाने केलेल्या दगडफे कीत सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी जखमी झाले. शिवाय दोन्ही गटांतील शेकडो लोक जखमी झाले होते. याप्रकरणी पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, जाळपोळ आणि लुटालूट करणे, मारहाण करणे, दंगल करणे आदी कलमांखाली एका गटाच्या हजार जणांविरोधात तर दुस-या गटातील सुमारे पाचशे लोकांविरोधात गुन्हा नोंदविला. या दंगलीप्रकरणी पोलिसांनी सय्यद अफरोज सय्यद नईम, शेख मोबीन शेख मोईन, शेख शहादाब शेख रफिक, शेख आरबाज, शेख रहीम, सय्यद मुमतीजीवात, सय्यद मोबीन, तरबेज खान इम्र्रान खान, शेख फरीद शेख शाहिद, मोहसीन ताहेर खान, वसीम यासीन खान, इम्रान पठाण सुभान पठाण, शेख नईम शेख कासीम, जुनेद खान, अन्वर खान आणि शेख जुनेद शेख अय्युब यांना अटक केली.