पोलीस-दरोडेखोरांत चकमक

By Admin | Published: December 11, 2014 12:20 AM2014-12-11T00:20:07+5:302014-12-11T00:47:21+5:30

औरंगाबाद : पहाटेच्या वेळी उस्मानपुरा परिसरातील एका बंगल्यावर दरोडा टाकत असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस गेले, तेव्हा पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चांगलीच चकमक उडाली.

Police-robbers fire | पोलीस-दरोडेखोरांत चकमक

पोलीस-दरोडेखोरांत चकमक

googlenewsNext

औरंगाबाद : पहाटेच्या वेळी उस्मानपुरा परिसरातील एका बंगल्यावर दरोडा टाकत असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस गेले, तेव्हा पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चांगलीच चकमक उडाली. यावेळी दरोडेखोरांनी दगडफेक आणि टॉमीने केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच बंगल्याचा सुरक्षारक्षकही जखमी झाला. पहाटे सव्वाचार ते साडेचार या कालावधीत घडलेल्या या थराराअंती दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
गुरुमुखसिंग कल्याणी ऊर्फ टॉम (रा. छोटा मुरलीधरनगर) व पप्पूसिंग कल्याणी (रा. छोटा मुरलीधरनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. दोघे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत. आरोपींच्या ताब्यातून दरोड्यात लुटलेले रोख साडेआठ हजार रुपये, तसेच टॉमी, सुरा, स्क्रू ड्रायव्हर जप्त करण्यात आले. त्यांचे साथीदार मात्र पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी झाले.
वॉचमनवर हल्ला करीत बंगल्यात घुसले
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजेच्या सुमारास कुख्यात गुन्हेगार टॉम, पप्पूसिंग व त्यांच्या सशस्त्र साथीदारांनी उस्मानपुऱ्यातील अ‍ॅडमिरल हॉटेलसमोर असलेल्या सुरेश शांतीलाल शहा यांच्या बंगल्यात प्रवेश केला. शहा हे कुटुंबासह विदेशात राहतात. त्यांच्या या बंगल्यावर शेख अंजूम शेख बाबा (रा. शंभूनगर) हे वॉचमन म्हणून नोकरी करतात. आत घुसताच दरोडेखोरांनी शेख अंजूम यांच्या डोक्यात लोखंडी टॉमीने जोरदार प्रहार केला. त्यामुळे ते खाली कोसळले.
मग दरोडेखोरांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यात दरोडेखोर घुसल्याचे जवळच राहणाऱ्या एका जणाच्या नजरेस पडले. त्याने तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला.
पोलिसांनी घेरताच सुरू केली दगडफेक
नियंत्रण कक्षाकडून बंगल्यात चोर घुसल्याची माहिती मिळताच उस्मानपुरा ठाण्याचे बीट मार्शल सहायक फौजदार काकासाहेब कुबेर, लोभाजी सुकरे, तसेच वन मोबाईलचे सहायक फौजदार बद्रीनाथ घोंगडे, के. बी. भादवे, गोपाल पुरभे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तो बंगला घेरला. पोलिसांची चाहूल लागताच चोरट्यांनी बंगल्यात मिळालेला ऐवज उचलून धूम ठोकली; परंतु आता आपण पकडले जाऊ, असे लक्षात येताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली.
या दगडफेकीत पोलीस कर्मचारी कुबेर आणि सुकरे यांना गंभीर मार लागला. सुकरे तर बेशुद्ध पडले. त्याचवेळी सहायक फौजदार घोंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. बंगल्याच्या मागील बाजूने ते पळाले. अचानक या दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या टॉमने अंधारातून धोंगडे यांच्या डोक्यावर टॉमीने प्रहार केला. मार लागल्यानंतरही धोंगडे यांनी टॉमला पकडले.
तितक्यात इतर पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले आणि त्यांनी टॉमला ताब्यात घेतले. त्याचवेळी टॉमची सुटका करण्यासाठी पप्पूसिंग पोलिसांवर चाल करून आला. त्याने केलेला वार चुकवीत पोलिसांनी त्यालाही मोठ्या शिताफीने पकडले. चकमकीची हीच संधी साधून या टोळीतील इतर दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले. तोपर्यंत घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. जखमी पोलीस व वॉचमनला तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले.
फरार झालेल्या साथीदारांच्या शोधार्थ संपूर्ण परिसर पिंजून काढला; परंतु ते सापडले नाहीत. या प्रकरणी आरोपींविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
बेशुद्धीचे नाटक केल्याने वॉचमन वाचला
दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात शहा यांच्या बंगल्याचा वॉचमन शेख अंजूम हा गंभीर जखमी झाला. फटका बसताच तो खाली कोसळला. आता जर आपण उठलो, तर दरोडेखोर आपला जीव घेतील, या भीतीपोटी वॉचमनने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. त्यामुळे तो बचावला.
आयुक्तांकडून दहा हजारांचे बक्षीस
आपल्या जिवाची पर्वा न करता या सशस्त्र दरोडेखोरांचा सामना करणाऱ्या उस्मानपुरा पोलीस व गुन्हे शाखा पोलिसांचे पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी कौतुक केले.
तसेच या पोलीस पथकाला दहा हजार रुपयांचे रोख बक्षीसही देण्यात आले.

Web Title: Police-robbers fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.