पोलिसाच्या सतर्कतेने रेल्वेच्या धड्केपासून वृद्ध बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:37 PM2018-08-01T18:37:33+5:302018-08-01T18:39:01+5:30
वयोमानामुळे झालेली कमजोर दृष्टी व बहिरेपणामुळे हा ज्येष्ठ रेल्वेखाली सापडणार, तोच एक सतर्क लोहमार्ग पोलीस धाव घेतो आणि त्या ज्येष्ठाचे प्राण वाचवितो.
औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशन. वेळ साधारण दुपारी २.३० वाजेची. एक ज्येष्ठ प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून उतरून थेट रुळावरून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनकडे निघतो. तेवढ्यात मोठ्याने हॉर्न वाजवीत रेल्वे येते. वयोमानामुळे झालेली कमजोर दृष्टी व बहिरेपणामुळे हा ज्येष्ठ रेल्वेखाली सापडणार, तोच एक सतर्क लोहमार्ग पोलीस धाव घेतो आणि त्या ज्येष्ठाचे प्राण वाचवितो. अवघ्या १० क्षणांचा हा मनाचा थरकाप उडविणारा प्रसंग सोमवारी अनेकांनी अनुभवला.
यशवंत गायकवाड, असे या सतर्क लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गायकवाड आणि लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी सोमवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर रेल्वेस्टेशनवर गस्त घालत होते. मनमाडला जाण्यासाठी आलेले ज्येष्ठ प्रवाशाला प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या रेल्वेकडे जायचे होते. त्यासाठी दादऱ्यावरून न जाता ते थेट प्लॅटफॉर्मखाली उतरले आणि रेल्वेरुळावरून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या दिशेने निघाले. तेवढ्यात प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर नगरसोल-चेन्नई एक्स्प्रेस दाखल होत होती. रेल्वेचालकास एक व्यक्ती रेल्वे रुळाच्या दिशने येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे चालकाने रेल्वेचा हॉर्न वाजविला. प्लॅटफॉर्मवर उभ्या काही प्रवाशांनीही आरडाओरड केली; परंतु काहीही उपयोग झाला नाही.
हा सगळा प्रकार गायकवाड यांच्या निदर्शनास पडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता प्लॅटफॉर्म एकवरून त्या ज्येष्ठाकडे धाव घेतली. रेल्वेचे इंजिन ज्येष्ठाच्या केवळ हाताच्या अंतरावर होते. ज्येष्ठाचे इंजिनसमोर पाऊल पडणार तोच पाठीमागून आलेल्या गायकवाड यांनी त्यांंना मागे ओढले. यात दोघेही खाली पडले. इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. हा सगळा प्रकार घडल्यानंतर सदर प्रवाशाला ऐकू येत नसल्याचे आणि दोन्ही डोळ्यांची दृष्टी कमी असल्याचे समोर आले. त्यातूनच हा सगळा प्रकार घडला; परंतु दैवबलवत्तर आणि गायकवाड यांचा प्रयत्न यामुळे सदर ज्येष्ठाचे प्राण वाचले.
बोलताही येत नव्हते
प्लॅटफॉर्मवरून उतरून ते रेल्वेसमोर जाण्यापर्यंत ज्येष्ठाला २५ सेकंद लागले, तर गायकवाड यांनी प्लॅटफॉर्मवरून धाव घेतल्यानंतर अवघ्या १० सेकंदांत त्यांना रेल्वेखाली सापडण्यापासून वाचविले. सदर प्रवाशाला बोलताही येत नव्हते. गळ्याची काहीतरी शस्त्रक्रिया झाली होती. मनमाडला जायचे हे त्यांनी खुणेने सांगितले. अवघ्या थोड्या अंतरावरील रेल्वेही त्यांना दिसली नाही; परंतु सुदैवाने त्यांना अपघात होण्यापासून वाचविण्यात यश आले, असे यशवंत गायकवाड म्हणाले.