बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना औरंगाबाद विमानतळाहून पाठवलं माघारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 09:46 PM2017-07-29T21:46:56+5:302017-07-29T21:47:05+5:30
औरंगाबादेत आलेल्या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना पोलिसांनी प्रवेश नाकारत चिकलठाणा विमानतळावरून परत पाठविले
औरंगाबाद, दि. 29 - औरंगाबादेत आलेल्या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना पोलिसांनी प्रवेश नाकारत चिकलठाणा विमानतळावरून परत पाठविले. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी तीन दिवसाच्या दौ-यानिमित्त तस्लीमा नसरीन औरंगाबादमध्ये आल्या होत्या. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.
जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन औरंगाबादेत विमानाने येत असून त्या हॉटेल ताज येथे मुक्कामी थांबणार आहेत,अशी माहिती शहरात पसरताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल ताज आणि चिकलठाणा विमानतळावर मोठ्या संख्येने गर्दी केली आणि घोषणाबाजी करण्यास सुरवात केली.
आमदार इम्तियाज जलील यांनी पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून तस्लीमा यांना शहरात प्रवेश दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, प्रेषितांबद्दल अपशब्द लिहिणा-या या लेखिकेला शहराच्या पवित्र भूमित पाय ठेवता येणार नाही,असा इशारा त्यांनी दिला. यानंतर पोलीस अधिका-यांनी तात्काळ चिकलठाणा विमानळावर धाव घेतली. एअर इंडियाच्या विमानाने रात्री साडेसात वाजता तस्लीमा विमातळावर येताच पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी तिची भेट घेतली आणि मॅडम तुम्हाला शहरात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगितले. यावेळी तस्लीमा यांनी त्यांचा नियोजित दौरा अत्यंत गुप्त असल्याचे पो.नि.परोपकारी यांना सांगितले. तेव्हा परोपकारी यांनी त्यांना तुमचा दौरा गुप्त राहिलेला नाही.तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार आहात,कोठे जाणार आहात,याबाबतची माहिती संपूर्ण शहरात पसरली असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे तुम्ही परत जा,अशी विनंती त्यांनी केली. एवढेच नव्हे तर विमानतळ अधिका-यांशी संपर्क साधून तस्लीमा आणि त्यांच्या मुलीला परत घेऊन जाण्याची विनंती केली.