पोलीस रस्त्यावर, तरीही चोरट्यांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:03 AM2021-02-15T04:03:56+5:302021-02-15T04:03:56+5:30
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरी आणि लूटमारीचे सत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी चौका-चौकांत आणि ...
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरी आणि लूटमारीचे सत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी चौका-चौकांत आणि विविध रस्त्यांवर बॅरिकेटस लावून नाकाबंदी केली. गस्त वाढविली, तरीही चोरीच्या घटना कमी व्हायचे नाव घेत नाहीत. शहरात नुकत्याच पाच मोटारसायकलींची चोरी व सोने लुटीच्या घटनांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
रेल्वेस्टेशन परिसरातील शनि मंदिरासमोर सादिक शेख अहमद (वय ४०, रा. बाबर कॉलनी) यांनी आपली मोटारसायकल (क्र. एमएच २०- डीएल- २८५५) उभी केली होती. ती ५ फेब्रुवारीला चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप विष्णू गायकवाड (२२, रा. आंबेडकरनगर) यांनी मोटारसायकलमधील (क्र. एमएच २०- एफएस-४४३४) पेट्रोल संपले म्हणून ती गजानननगर येथील दारूच्या दुकानासमोर उभी करून ते घरी गेले. चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पडेगाव परिसरातील गणेशनगर येथील रहिवासी तुळशीराम शांतिलाल ब्रम्हकर ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होेते. त्यांनी आपली मोटारसायकल (क्र. एमएच २०- सीएल- ७७३७) ढाब्यासमोर उभी केली. ती चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद मोईन नवाब (५४, रा, भोईवाडा) यांनी घरासमोर उभ्या केलेल्या मोटारसायकलीचे (क्र. एमएच २०- डीआर- ७९५६) हँडल लॉक तोडून चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर, गारखेडा येथील रहिवासी रावसाहेब पंडित (३७) यांनी घरासमोर उभी केलेली मोटारसायकल (क्र. एमएच २०- बीबी- २३२९) चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.