पोलिसांचा दणका! महिलांची छेडछाड करणारा कुख्यात गुंड 'एमपीडीए'अंतर्गत स्थानबद्ध
By राम शिनगारे | Published: August 18, 2022 07:45 PM2022-08-18T19:45:04+5:302022-08-18T19:45:24+5:30
जिल्ह्यात सलग तिसरी कारवाई : पोलीस अधीक्षकांच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी
औरंगाबाद : पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मनीष कलवानिया यांनी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका लावला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत तीन कुख्यात गुंडांना 'एमपीडीए' कायद्यानुसार हर्सूल कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले. सिल्लोड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत महिलांची छेडछाड करणारा कुख्यात गुंड रामदास विठ्ठल वाघ (३३,रा. केळगाव, ता. सिल्लोड) याच्या स्थानबद्धतेची कारवाई बुधवारी करण्यात आली.
कलवानिया यांनी पाचोड हद्दीतील सराईत गुन्हेगार अमोल जगन्नाथ चिडे (रा. मुरमा, ता. पैठण), कुख्यात वाळू माफिया मुजीब अब्दुल शेख (रा. सनव, ता. गंगापूर) यांना एमपीडीए कायद्यानुसार वर्षभरासाठी स्थानबद्ध केले. यानंतर रामदासचा नंबर लागला. त्याच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अवैध मद्यविक्री, महिलांचा विनयभंग, शासकीय कामकाजात अडथळा, मारहाण अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
याशिवाय तो दारू पिण्यासाठी लोकांना धमकावून पैसे मागणे, न दिल्यास मारहाण करण्याचे प्रकार नित्याचेच बनले होते. त्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना रोखण्यासाठी अनेक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याचे गुन्हे चढत्या क्रमाने सुरूच राहिले. त्यामुळेही कारवाई करण्यात आली. याविषयीचा प्रस्ताव कलवानिया यांनी मंजुरीसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे पाठवला होता. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी १७ ऑगस्ट रोजी मंजुरी दिली. त्यानंतर वाघ यास पोलिसांनी पकडून आणत हर्सूल कारागृहात टाकले. ही कामगिरी अधीक्षक कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी विजयकुमार मराठे, निरीक्षक रामेश्वर रेंगे, सीताराम मेहेत्रे, उपनिरीक्षक विकास आडे, अंमलदार विठ्ठल राख, सचिन सोनार, राजू काकडे यांनी केली.