दिवाळीत चो-या, घरफोड्या रोखण्यात पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:43 AM2017-10-24T00:43:33+5:302017-10-24T00:43:33+5:30
पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी दिवाळी उत्सवापूर्वी आणि नंतर होणा-या चो-या, घरफोड्या रोखण्यात यावर्षी शहर पोलिसांना यश आले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी दिवाळी उत्सवापूर्वी आणि नंतर होणा-या चो-या, घरफोड्या रोखण्यात यावर्षी शहर पोलिसांना यश आले. जीपीएस मोबाईल गस्त आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांनी ठेवलेला वचक हे यामागचे गमक असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी नमूद केले.
दरवर्षी दसरा, दिवाळी उत्सवात शहरात मोठ्या प्रमाणात चो-या, घरफोड्या होतात. यामुळे दिवाळीच्या सुटीत सहलीवर आणि गावी जाणा-या नागरिकांना घराच्या सुरक्षेबाबत सतत चिंता असते. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिसांनी दीपोत्सवाच्या महिनाभर आधीच नियोजनबद्ध काम हाती घेतले. हे काम होते रेकॉर्डवरील चो-या, घरफोड्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्याचे. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शहरात आल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मोक्का, स्थानबद्धता आणि तडीपारीसारख्या कारवाईचे आदेश दिले. हे आदेश प्राप्त होताच उपायुक्त राहुल श्रीरामे आणि उपायुक्त विनायक ढाकणे यांनी त्यांच्या परिमंडळातील गुन्हेगारांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत प्रत्येक ठाण्यांतर्गत टॉप २० गुन्हेगारांचे मोबाईल नंबर घेऊन त्याना जीपीएसशी जोडण्यात आले होते. परिणामी कोणत्या वेळी कोणता गुन्हेगार कोठे होता आणि आहे याबाबतची सर्व माहिती पोलिसांना सहज उपलब्ध होते. यासोबतच जे चोरटे सक्रिय आहेत त्यांना कारागृहात बंद करण्यात आले. पोलिसांकडून कडक कारवाई सुरू झाल्यापासून अनेकांनी शहरातून मुक्काम हलविणेच पसंत केले. पोलिसांची गस्त नियमित आणि योग्य झाली अथवा नाही, याबाबतचा अहवाल रोजच्या रोज पोलीस आयुक्तांच्या टेबलवर जातो. या अहवालाच्या आधारे पोलिसांची एक जरी व्हॅन एकाच ठिकाणी उभी असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतचे उत्तर तात्काळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना विचारले जाते. यामुळे एखाद्या ठाण्याची गाडी नादुरुस्त झाली असल्यास मोटार वाहन कार्यशाळेतून तात्काळ दुसरी गाडी उपलब्ध केली जाते. यामुळे गस्त कोणत्याही परिस्थितीत थांबत नाही. जीपीएस आधारित पोलिसांच्या गस्तदरम्यान कोणताही व्यक्ती संशयास्पद दिसल्यास त्याची विचारपूस होते. शिवाय चो-या, घरफोड्या टाळण्यासाठी नागरिकांनी काय उपाययोजना करावी, याबाबतचे जागरण करणारे पत्रक पोलिसांकडून शहरात वाटण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले. परिणामी चो-या रोखण्यात आम्ही यशस्वी झालो.