पोलिसांनी हाती घेतली स्वच्छता मोहीम
By Admin | Published: August 27, 2014 01:29 AM2014-08-27T01:29:19+5:302014-08-27T01:38:12+5:30
दिंद्रुड: येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने एक सामाजिक बांधीलकी म्हणून मागील तीन दिवसांपासून स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे.
दिंद्रुड: येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने एक सामाजिक बांधीलकी म्हणून मागील तीन दिवसांपासून स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. पावसाळ्यात शहरात झालेली घाण आणि त्यापासून नागरीकांचे धोक्यात आलेले आरोग्य याची दखल घेत ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. ही मोहिम राबविणारे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
ग्रामीण भागात पोलीसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन खुप वेगळा असतो. मात्र त्यांचा विश्वास जिंकत शहरातील व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळील स्वच्छता करण्यास दिंद्रूड पोलीस ठाण्याच्या वतीने मोहीम हाती घेतली. या मोहिमेला ग्रामस्थांमधून उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत आहे. दिंद्रूड पोलीस ठाण्याच्या परिसरात व सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणारे कर्मचारी यांच्या निवासस्थानाशेजारीच मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होते. कॉलनीत सर्वत्र काटेरी बाभळ, गवत व घाण पाणी साचले होते. त्यामुळे येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले होते. येथे राहण्यास कर्मचाऱ्यांमधून टाळाटाळ होत होती. कर्मचाऱ्यांचे होत असलेले हाल लक्षात घेता येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांनी शनिवारपासून स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत ठाण्याचे सर्वच अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.
ग्रामस्थांच्या वतीने पोलीस कॉलनीच्या परिसरातील झाडेझुडपे तोडून पथदिवे बसविले जात आहेत. जुन्या इमारतीच्या ठिकाणी अनेक मोठमोठी झाडे धोकादायक बनली होती, ती झाडेही ग्रामस्थांच्या मदतीने तोडण्यात आली. ही झाडे तोडण्याअगोदरच चौधरी यांनी इतर दोन झाडांची लागवड केली होती हे मात्र विशेष. ग्रामस्थ व पोलीस यांच्या समन्वयातून ही स्वच्छता मोहीम राबविली जात असल्याने इतरांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. चौधरी यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. (वार्ताहर)