पोलिसांच्या टॉपर मुलांना मिळणार एक लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:02 AM2017-12-29T00:02:45+5:302017-12-29T00:02:49+5:30
इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजमध्ये टॉपर येणाºया पोलिसांच्या मुलांना एक लाख रुपये शिष्यवृत्ती पोलीस विभागाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी येथे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजमध्ये टॉपर येणाºया पोलिसांच्या मुलांना एक लाख रुपये शिष्यवृत्ती पोलीस विभागाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी येथे केली.
एका हॉटेलमध्ये आयोजित पोलीस पाल्यासाठी करिअर समुपदेशन आणि उच्चशिक्षण घेत असलेल्या पोलीस पाल्यांना शिष्यवृत्ती वाटपाच्या कार्यक्रमप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. आय.आय.टी. आणि मेडिकलचे शिक्षण घेणाºया २२ विद्यार्थ्यांना पोलीस विभागातर्फे प्रत्येकी २५ हजार रुपये आणि एनजीओकडून प्रत्येकी २५ हजार असे एकूण ५० हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे यावेळी पोलीस महासंचालकांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. एनजीओतर्फे आयोजित राज्यातील पोलीस पाल्यांसाठी करिअर समुपदेशचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस (प्रशासन) महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, राज्य सरकारच्या गृहविभागाचे सीएसआर सल्लागार रामकृष्ण तेरकर, स्वयंसेवी संस्थेचे केतन देशपांडे यांची मंचावर उपस्थिती होती. याप्रसंगी महासंचालक म्हणाले की, पोलिसाच्या मुलाने पोलीस कॉन्स्टेबल व्हावे, ही मानसिकता आता बदलली पाहिजे. पोलीस भरतीऐवजी मेडिकल, आयआयटी संस्था आणि अन्य उच्चशिक्षण देणाºया महाविद्यालयात पोलिसांच्या मुलांसाठी आरक्षण ठेवले तर पोलिसांची प्रतिमा उंचावेल. आज २२ मुलांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. पुढील वर्षी या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयआयटी, मेडिकलमध्ये शिकत असलेली जी मुले टॉपर येतील त्यांना एक लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा यावेळी महासंचालक माथुर यांनी केली.
यावेळी अप्पर महासंचालक डॉ. सरवदे म्हणाल्या की, पोलिसांना ड्यूटीमुळे त्यांच्या कुटुंबियांकडे लक्ष देता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन पोलीस पाल्यांना जास्तीत जास्त सवलती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. विशेष पोलीस महानिरीक्षक भारंबे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस आयुक्त यादव यांनी शहर पोलिसांनी घेतलेल्या नोकरी मेळाव्यात पोलीस पाल्यांना आॅन दी स्पॉट रोजगार मिळाला. तो पॅटर्न राज्यभर राबविण्यात यावा, अशी विनंती केली.