मुख्यालयातच पोलीस मास्क काढून गप्पा मारत होते; आयुक्तांनी फैलावर घेत लावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 12:31 PM2021-03-17T12:31:39+5:302021-03-17T12:32:52+5:30
पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तोंडाला मास्क न लावता, सहकारी कर्मचाऱ्यांसोबत गप्पा मारणे दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले. त्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड ठोठावत, एका तासात अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता हे एक बैठक आटोपून मंगळवारी दुपारी दीड वाजता मुख्यालयात पोहोचले. मुख्यालयात गाडीतून उतरून आत जात असताना, त्यांना प्रवेशद्वारातच एक महिला पोलीस कर्मचारी ही आपल्या तोंडावरील मास्क काढून दुसऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत गप्पा मारत असल्याचे दिसले. या दोन्ही महिला पोलिसांना आयुक्त डॉ.गुप्ता यांनी मास्क काढून बोलत असल्याबद्दल चांगलेच फैलावर घेत, पाचशे रुपयांची दंड भरण्याचे, तसेच दंड भरलेली पावती एका तासाच्या आत सादर करण्याचे आदेश दिले.