राजपूत दाम्पत्याचे मोबाईल कॉल डिटेल्स पोलिसांनी मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 07:19 PM2019-09-20T19:19:20+5:302019-09-20T19:21:26+5:30
दोन्ही मुलींना बसला मानसिक धक्का
औरंगाबाद : उद्योजक शैलेंद्र राजपूत हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांनी राजपूत दाम्पंत्याच्या मोबाईल कॉल डिटेल्सची माहिती मागविली आहे. शैलेंद्र यांनी शेवटचा कॉल कोणाला केला आणि त्यांचे काय बोलणे झाले, तसेच आरोपी पूजा हिने पतीच्या हत्येनंतर कोणाला कॉल केला, त्या व्यक्तींची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उल्कानगरीतील मे-फेअर या उच्चभू्र वसाहतीत राहणारे उद्योजक शैलेंद्र राजपूत यांचा सोमवारी रात्री त्यांची पत्नी पूजा हिने चाकूने भोसकून खून केला. तेव्हापासून पूजा पोलिसांच्या कोठडीत आहे. या खुनाचा तपास करणारे पोलीस पथक गुरुवारी दुपारी घटनास्थळी गेले होते. यावेळी त्यांनी राजपूत दाम्पत्याच्या दोन्ही मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही मुली मानसिक धक्क्यात आहेत. यामुळे पोलिसांना त्यांच्याशी बोलता आले नाही.
घटनेच्या रात्री शैलेंद्र हे घरी आले तेव्हा ते आर्किटेक्ट मैत्रिणीसोबत बोलत होते. त्या मैत्रिणीवरूनच या दाम्पत्यात भांडण झाले आणि हत्येची घटना घडली. यामुळे शैलेंद्र आणि त्या आर्किटेक्ट व्यक्तीचे काय नाते होते, याबाबतची माहिती पोलीस घेणार आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, घटनेच्या रात्री शैलेंद्र यांचे शेवटचे बोलणे कोणासोबत झाले, तसेच पूजा यांनी पतीच्या हत्येनंतर नंदनवन कॉलनीतील मैत्रिणीला कॉल केला होता, अशी माहिती पोलिसांना समजली. मात्र, मृत आणि पूजा यांचे मोबाईल कॉल डिटेल्स मिळाल्यानंतरच या गुन्ह्याच्या तपासाला काही दिशा मिळते का, हे लवकरच कळणार आहे.
पूजा शांतपणे ठाण्यात बसून
पोलीस कोठडीतील पूजा राजपूत ही शांतपणे जवाहरनगर पोलीस ठाण्यातील एका खोलीत बसून असते. दोन महिला पोलिसांचा तिच्यावर खडा पहारा असतो. पोलिसांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बोलत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान तिची बहीण पूजाला भेटण्यासाठी ठाण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात भेट झाली अथवा त्यांच्यात काय बोलणे झाले, याबाबत दुजोरा मिळू शकला नाही. खून केल्याच्या आरोपाखाली अटकेतील पूजा राजपूतच्या बहिणीने आज जवाहरनगर पोलीस ठाण्यात तिची भेट घेतली. यानंतर आग्रहाखातर तिने जेवण केले.