पोलिसांनी सहज हटकले आणि त्याच्याकडे सापडले २१ मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 07:53 PM2018-11-22T19:53:34+5:302018-11-22T19:54:31+5:30
रेल्वेस्टेशन परिसरात संशयितरीत्या फिरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांनी हटकले आणि तो चक्क मोबाईल चोर निघाला.
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरात संशयितरीत्या फिरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांनी हटकले आणि तो चक्क मोबाईल चोर निघाला. रेल्वेस्टेशनसह उस्मानपुरा, बनेवाडीतून चोरलेले २ लाख ४० हजार रुपये किमतीचे तब्बल २१ मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी चोरट्याकडून जप्त केले.
संदीप गौतम हिवराळे (२०, रा. बनेवाडी), असे चोरट्याचे नाव आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांच्यासह लोहमार्ग आणि ‘आरपीएफ ’चे कर्मचारी २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता रेल्वेस्टेशनवर गस्त घालत होते, तेव्हा संदीप हिवराळे हा संशयितरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्यास हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याजवळ ३ मोबाईल आढळून आले. त्याने हे मोबाईल रेल्वेस्टेशन, उस्मानपुरा, बनेवाडीतून चोरल्याची क बुली दिली. तसेच चोरी केलेले आणखी काही मोबाईल घरी लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्याकडून २ लाख ४० हजार २०० रुपये किमतीचे २१ मोबाईल जप्त केले. ज्यांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत, त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप साबळे यांनी केले.