बायपासवर पोलिसांची ‘स्पीडगन’नजर; अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:01 PM2018-09-14T18:01:41+5:302018-09-14T18:03:38+5:30
वाहनांची गती मोजण्यासाठी ‘स्पीडगन’ची नजर ठेवली आहे.
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : अपघात सत्र रोखण्यासाठी वाहतूक शाखेने बायपासवरील जडवाहनांना सहा तास बंदी केली आहे. दरम्यान, मोकळ्या रस्त्यावर भरधाव येणाऱ्या वाहनांची गती मोजण्यासाठी ‘स्पीडगन’ची नजर ठेवली आहे. तीन दिवसांत पंधरा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
रस्त्यावर वाहनांची गती मोजून सचित्र दाखवीत दंडात्मक कारवाई होत असल्याने ‘आता नाही चालणार भरधाव गतीचा बहाणा’ असा संदेश वाहनचालकांत पसरला आहे. झाल्टा फाटा जुना चिकलठाणा रोडदरम्यान वाहतूक शाखेचे कर्मचारी गनद्वारे रस्त्यावर नजर लावून थांबत आहेत.
नको दंडात्मक कारवाई म्हणून निर्धारित करून दिलेली गती (४०) च्या अधिक गतीने दिसणारे वाहन टार्गेट केले जाते . घाईने जाणे म्हणजे अपघातास निमंत्रण देणे किंवा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
तीन स्पीडगनपैकी एकच सुरू
बायपास, जळगाव रोड तसेच वाळूज रोडसाठी तीन स्पीडगन वाहतूक शाखेकडे होत्या; परंतु त्यापैकी दोन बिघडल्या असून, एकच गन सुरळीत सुरू आहे; परंतु झाल्टा फाटा येथे वाहनचालकांची गती मंदावल्याने सध्या तरी अपघात टळले आहेत. विरुद्ध दिशेने जाणाऱ्यांना रोखण्यासाठी तत्परता दाखवावी, त्याचाही फायदा होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाहतूक मर्यादा ओलांडू नये
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, स्पीडगन पुन्हा रस्त्यावर उतरवल्याने वाहनधारक उडवाउडवीची उत्तरे देणे शक्य नाही. वेगमर्यादा, दुभाजक कट, ओव्हरटेक असे फलक लावले असून, लवकरच झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्यात येणार आहे. फौजदार प्रताप नवघरे, पोहेकॉ नंदू नरवडे, खुशाल पाटील, सचिन आल्हाट आदी कर्मचारी कार्यरत आहेत.