खैरे-सावे यांच्यात राजकीय हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:58 AM2018-06-18T00:58:44+5:302018-06-18T00:59:14+5:30
शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आणि भाजपचे पूर्व मतदारसंघातील आ. अतुल सावे यांच्यात मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत. युती असताना एकत्रित नांदणाऱ्या या दोन्ही लोकप्रतिनिधींमधील हे द्वंद्व कशामुळे सुरू आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आणि भाजपचे पूर्व मतदारसंघातील आ. अतुल सावे यांच्यात मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत. युती असताना एकत्रित नांदणाऱ्या या दोन्ही लोकप्रतिनिधींमधील हे द्वंद्व कशामुळे सुरू आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
समांतर जलवाहिनी, महापालिकेतील रस्ते अनुदान, राजकीय कार्यक्रमांत नाव न टाक णे, कार्यक्रमला बोलवायचे आणि वाट न पाहता कार्यक्रम आटोपून घ्यायचा. यापासून ते १२ मेच्या दंगलीच्या घटनेसह १५ जूनच्या सिडकोतील हरितपट्टा विकास कार्यक्रम भूमिपूजनापर्यंत राजकीय हल्लाबोल होण्याचे प्रकार घडले आहेत. प्रत्येक व्यासपीठावर या दोघांमध्ये काहीना काही मुद्यांवर बिनसत असल्याचे दिसते आहे.
एकमेकांना टोले देणे, राजकीय चिमटे, शालजोडे देण्यामुळे ही जोडगोळी चर्चेत राहण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना, असाही प्रश्न आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच हा सगळा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात
आहे.
मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम, डीपीसीच्या बैठकांमध्ये खैरेंना तोंडघशी पाण्यात सावे आघाडीवर आहेत, तर पालिकेच्या कार्यक्रमांसह पक्षाच्या व्यासपीठावर सावे व भाजपवर खैरे तोंडसुख घेत असल्याचे
दिसते.
गेल्या आठवड्यात सिडको कार्यालयासमोर हरितपट्टा विकासाचे भूमिपूजन सकाळी ११ वा. ठेवले होते. मतदारसंघातील कार्यक्रम असल्यामुळे सावे वेळेवर पोहोचले. कार्यक्रम सुरु न झाल्याने ते निघून गेले. नंतर खा. खैरे दुपारी २ वाजेच्या सुमारास आले. त्यांनी महापौर घोडेले, सभापती राजू वैद्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आटोपून घेतला.
आ. सावे यांना हा प्रकार कळताच त्यांनी कार्यक्रम स्थळ गाठून खा. खैरेंसह सर्वांना वरच्या आवाजात सुनावले. माझ्या मतदारसंघातील कार्यक्रमाला मला टाळण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. मी सगळ्यांना बघून घेईन, असा संताप सावेंनी
केला.
मी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असताना माझी वाट का पाहिली नाही, असे सावे चिडून बोलले. खैरेंनी सावेंचा संताप लीलया पचवून घेतला. कारण त्यांनी सावेंची वाट न पाहता कार्यक्रम उरकून त्यांचा पुरता अवमान केला होता.
अटीतटीच्या वक्तव्याची स्पर्धा
महापालिकेतील समांतर जलवाहिनीवरून आॅक्टोबर २०१५ पासून सावे आणि खैरे यांच्यात वाद पेटला आहे. तत्कालीन मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्या अविश्वास ठरावावरून दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा वाद झाला. खा. रावसाहेब दानवे यांच्या चिरंजीवाच्या विवाहसोहळ्यात आ. सावे यांनी खा. खैरे यांना खुर्चीवरून उठविण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये अटीतटीची वक्तव्ये करण्याची स्पर्धा लागली आहे.
१२ मे रोजी जुन्या शहरात झालेल्या दंगलीनंतर खा. खैरे यांनी आ. सावे यांच्यावर आरोप केले. सावे घटनास्थळी नव्हतेच, असे ते म्हणाले होते. त्यावर सावे यांनी प्रत्युत्तर देत खैरे यांची स्मृती गेल्याचा टोला लगावला होता. युती होवो अथवा न होवो, खैरेंना चारीमुंड्या चीत करण्याची भाषा भाजपच्या गोटातून सुरू असण्यामागे हे वाददेखील असू शकतात.