लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी राजकीय स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:03 AM2021-06-23T04:03:56+5:302021-06-23T04:03:56+5:30
औरंगाबाद : शासनाने १८ पेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येकाला लस देण्याची घोषणा केली. शहरात या निर्णयानुसार व्यापक प्रमाणात अंमलबजावणी ...
औरंगाबाद : शासनाने १८ पेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येकाला लस देण्याची घोषणा केली. शहरात या निर्णयानुसार व्यापक प्रमाणात अंमलबजावणी सुरू झाली. लसीकरणाला तरुणाईकडून मिळत असलेला प्रतिसाद बघता, राजकीय मंडळींनी आमच्या वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू करा, असा आग्रह मनपाच्या आरोग्य विभागाकडे धरण्यात येत आहे. एका पक्षाच्या राजकीय नेत्याची मागणी मान्य केली, तर दुसऱ्या पक्षाचे नेते बाह्या सरसावत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढत आहे.
शहरात लसीकरण मोहिमेला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला हवा, तसा मिळत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने माजी नगरसेवकांची मदत घेतली होती. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू असताना अनेक केंद्रांवर राजकीय मंडळींनी ताबा मिळविला. संभाव्य मतदार डोळ्यासमोर ठेवून राजकीय मंडळींनी स्वत:हून मंडप, नागरिकांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था केली. महापालिकेने त्यावरही आक्षेप घेतला नाही. आता शासन आदेशानुसार मंगळवारपासून १८ पेक्षा अधिक वय असलेल्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे राजकीय मंडळी मनपाच्या आरोग्य विभागाकडे, आमच्या वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू करा, असा आग्रह धरीत आहेत. मनपाने मागणीनंतर लसीकरण केंद्र सुरू केले तरी, दुसऱ्या दिवशी अन्य पक्षाचे नेते, कार्यकर्ते, आम्हालाही स्वतंत्र केंद्र द्या, त्यांना कसे दिले? असे वाद होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सध्या सावध पवित्रा घेतला आहे. शहरात ६९ कोविशिल्डचे, तर ३ कोव्हॅक्सिनची केंद्रे सुरू ठेवली आहेत.
कोट
वाॅर्डनिहाय लसीकरण केंद्रे यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत. शहरातील काही भागांतील चार ते पाच स्थानिक राजकीय नेत्यांकडून लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. मात्र, लसीकरण केंद्र या नेत्यांना देण्याबाबत कुठलाही विचार नाही.
- नीता पाडळकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा.