आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेवर राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी: विनोद पाटील
By बापू सोळुंके | Published: May 4, 2024 05:43 PM2024-05-04T17:43:02+5:302024-05-04T17:43:38+5:30
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचे एसईबीसी आरक्षण रद्द करताना ५० टक्केची मर्यादा ओलांडल्या गेल्याचा मुद्दा अधोेरेखीत केले होते.
छत्रपती संभाजीनगर: एसईबीसी आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्केची मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा अधोरेखीत केला होते. आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास ५० टक्केची मर्यादा तोडून टाकू असे विधान केले. आता महाराष्ट्रात लढणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ५० टक्केच्या मर्यादेसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी शनिवारी येथे केली.
राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के एसईबीसी आरक्षण लागू केले आहे. यामुळे आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा ओलांडली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचे एसईबीसी आरक्षण रद्द करताना ५० टक्केची मर्यादा ओलांडल्या गेल्याचा मुद्दा अधोेरेखीत केले होते. यामुळे नवीन मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल अथवा नाही, याविषयी समाजबांधवाना सांशकता आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ते सत्तेत आल्यास ५०टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करू असे वक्तव्य केले आहे. हा धागा पकडत विनोद पाटील यांनी नमूद केले की, राहुल गांधी यांच्या विधानाचे आपण स्वागत करतो. मात्र त्यांचे हे विधान चुनावी जुमला असू नये, असे वाटते. यासोबतच महाराष्ट्रात निवडणूक लढविणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणासंदर्भात ५० टक्केची मर्यादा या मुद्द्यावर भूमिका जाहिर करावी,अशी मागणीही पाटील यांनी केली.