रसवंत्यांच्या परवान्यासाठी राजकीय दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:28 PM2019-01-19T18:28:23+5:302019-01-19T18:29:00+5:30
रसवंत्यांना मनपाकडून देण्यात येणाऱ्या परवान्यांसाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. जालना रोड, सिडको-हडकोतील ठराविक चौकांसाठी असंख्य अर्ज आले आहेत.
औरंगाबाद : मकरसंक्रांत संपल्यावर थंडी हळूहळू कमी होत जाते. थंडी अजून पूर्णपणे गेलेली नसतानाही शहरातील रसवंती चालकांनी महापालिकेतील राजकीय वातावरणात गरमी आणली आहे. रसवंत्यांना मनपाकडून देण्यात येणाऱ्या परवान्यांसाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. जालना रोड, सिडको-हडकोतील ठराविक चौकांसाठी असंख्य अर्ज आले आहेत. बोली लावून मनपाने परवाने द्यावेत, जेणेकरून महापालिकेच्या महसुलात वाढ होईल, असे पत्रच नगरसेविका राखी प्रशांत देसरडा यांनी प्रशासनाला दिले.
उन्हाळा सुरू होताच शहरातील प्रत्येक चौकात एक तरी रसवंती लावण्यात येते. काही ठिकाणी रसवंत्यांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. फुटपाथवर, ग्रीन बेल्टच्या जागेवर दरवर्षी राजरोसपणे रसवंत्या सुरू करण्यात येतात. आश्चर्याची बाब म्हणजे महावितरण त्यांना तात्पुरते विजेचे मीटरही देते. महापालिकेच्या नाकावर टिच्चून अनेक वर्षांपासून बेकायदा रसवंत्या थाटणाºयांची संख्याही बरीच आहे. गतवर्षी महापालिकेकडून तात्पुरती परवानगी घेणाºयांची व वीज कंपनीकडून रसवंतीसाठी वीज घेणाºयांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचे समोर आले होते. यंदा फेब्रुवारीतच महापालिकेच्या मालमत्ता विभागात शेकडो अर्ज आले आहेत. कॅ नॉट मार्केट, जळगाव रोड, सिडको बसस्थानक, एन-६ आदी परिसरात सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हे अर्ज मंजूर करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांसह लोकप्रतिनिधींचे फोन महापालिकेत खणखणत आहेत.
मागील वर्षी पुणे येथील अनेक व्यापाºयांनी शहरात शिरकाव केला होता. स्थानिकांनी घेतलेल्या परवान्यावरच त्यांनी रसवंती सुरू केली होती. यासंदर्भात नगरसेविका राखी देसरडा यांनी मालमत्ता अधिकाºयांना पत्र दिले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, रसवंत्यांना देण्यात येणारी तात्पुरती परवानगी बोली पद्धतीने द्यावी. यामुळे महापालिकेला एका रसवंतीमागे एक लाख रुपयेही मिळू शकतात.