नानांच्या नाराजीमागे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:36 AM2018-08-22T00:36:50+5:302018-08-22T00:38:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभाराप्रती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभाराप्रती केवळ राजकीय द्वेषातूनच नाराजी व्यक्त केली, असा आरोप जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी केला आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी त्यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये एकदाही आक्रमक पवित्रा घेतला नाही. वर्षभरापूर्वी आपण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतली. याची कल्पना नानांना आहे. तरीही त्यांनी काल जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. गेल्या २९ वर्षांमध्ये कोल्हापुरी बंधाºयांचे गेट चोरीस गेले आहेत. काही नादुरुस्त आहेत. त्यामुळे नव्याने गेट बसवून बंधाºयांमध्ये पाणी अडविण्यासाठी गेल्या वर्षी आपण निविदा प्रक्रिया सुरू केली. १७ जुलै २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत गेट खरेदीसंबंधी दराला मंजुरी देण्याचा प्रस्ताव चर्चेला ठेवला. तेव्हा सभागृहाने सदरचा प्रस्ताव फेटाळला. यापूर्वी अशा प्रकारचा प्रस्ताव एकदाही सभागृहात सादर करण्यात आलेला नव्हता.
जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाºयांना गेट खरेदीसाठी ६ कोटी ५५ लाख २३ हजार रुपयांची आवश्यकता आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीमध्ये सातत्याने मागणी के ल्यानंतरही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात गेट खरेदीसाठी १ कोटी ७५ लाख रुपयांची उपकरात तरतूद करण्यात आली आहे. याची निविदा प्रक्रिया कामनिहाय महिनाभरातच पूर्ण केली जाईल. विधानसभा अध्यक्षांनी जिल्हा नियोजन समिती असेल किंवा शासनाकडून यासाठी चार वर्षांत एक छदामही उपलब्ध करून दिलेला नाही. याउलट ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेला, बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हा परिषदेला, तर सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेसाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. ही जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे बागडे हे कदाचित शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत नसावेत, असे सांगून डोणगावकर म्हणाल्या की, बागडे हे संपूर्ण जिल्ह्याचे नेते आहेत, असे असताना त्यांचा आग्रह सातत्याने केवळ फुलंब्री तालुक्यापुरताच असतो, हे योग्य वाटत नाही.
त्यांचे ‘टार्गेट’ शिवसेना
जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर हरिभाऊ बागडे यांनी काल जोरदार हल्लाबोल केला. ही बाब जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या फारच जिव्हारी लागली.
नाना हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मनात आणले असते, तर चार वर्षांत शासनाचा मोठा निधी जिल्हा परिषदेला मिळवून दिला असता; पण शिवसेनेच्या ताब्यात जिल्हा परिषद असल्यामुळे त्यांनी निधी तर आणलाच नाही, उलट या जिल्हा परिषदेला ‘टार्गेट’ केले आहे, असा आरोप जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांनी केला.