बरखास्तीवरुन राजकारण तापले
By Admin | Published: April 23, 2016 11:41 PM2016-04-23T23:41:06+5:302016-04-23T23:57:04+5:30
उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीवरुन उदगीरात चांगलेच राजकारण तापले आहे़ बाजार समिती ताब्यात ठेवून असणाऱ्या
उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीवरुन उदगीरात चांगलेच राजकारण तापले आहे़ बाजार समिती ताब्यात ठेवून असणाऱ्या माजी आ़चंद्रशेखर भोसले यांनी ही बरखास्ती म्हणजे राजकीय सूडबुद्धी असून, विद्यमान आमदारांनी आता कोणत्याही कुबड्या न घेता थेट निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले़ तर आमदार सुधाकर भालेराव यांनी ही तर सुरुवात आहे, असा सूचक इशारा दिला़
बाजार समितीत एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा भोसले यांनी केला़ बरखास्तीच्या आदेशात कोठेही भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख नाही़ आपण पारदर्शकच कारभार केला़ मात्र, केवळ अनियमतता व योजनांना मंजुरी न घेतल्याच्या मुद्यावरुन बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला आहे़
बालिका बचाव योजना, शेतकरी विमा योजना, आरोग्य योजना या शेतकऱ्यांच्या हिताच्याच होत्या़ परंतु, केवळ राजकीय सूडबुद्धीने नियमावर बोट ठेवत बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे़ याविरोधात आम्ही आधीच न्यायालयात गेलो आहोत़ ३ महिने प्रतिष्ठा पणाला लावून सत्तेचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप करीत एवढाच वेळ आमदारांनी उदगीरच्या पाणीप्रश्नाला देणे गरजेचे होते, असे मतही चंद्रशेखर भोसले यांनी व्यक्त केले़ दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीचे घोडामैदान दूर नाही़ त्यात आमदारांनी स्वबळावर उतरुन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले़
आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले की, बाजार समितीच्या भ्रष्टाचाराबाबत बोलायचे झाल्यास वेडा कधी स्वत:ला वेडा म्हणवून घेत नाही, अशी ‘त्यांची’ अवस्था आहे़
गैरकारभार झाल्याशिवायच का बरखास्ती झाली आहे? लढण्याचे म्हणाल तर शेतकऱ्यांची फसवणूक व भ्रष्टाचार याविरुद्ध आपण कायमच लढत आहोत़ ही लढाई पुढेही लढणार आहोतच़ भ्रष्टाचार मुळासकट उपसून टाकून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे़ शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाखाली सुरु केलेल्या योजनांतून लूट झाल्याचा आरोप करीत तेही लवकरच बाहेर येईल, असे भालेराव म्हणाले़(वार्ताहर)