बछड्यांच्या बारशातही कुरघोडी; ‘आदित्य’ नाव ठेवण्यास शिंदे, पवार, मुनगंटीवारांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 07:40 PM2023-09-18T19:40:31+5:302023-09-18T19:50:34+5:30
‘आदित्य’ नाव नको, दुसरी चिठ्ठी काढा; आदित्यचं नाव डावललं सरकारनं...
छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्पिता’ या वाघिणीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या बछड्यांच्या बारशाचा कार्यक्रम १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उरकला. या बारशावरून राजकीय घुगऱ्या मात्र शिजल्या. बछड्याचे ‘आदित्य’ नाव ठेवण्यास तिन्ही मंत्र्यांनी विरोध केल्यामुळे दिवसभर राजकीय वातावरण ढवळून निघाले.
बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चिठ्ठ्या काढल्या. त्यावरील ‘श्रावणी’, ‘विक्रम’ आणि ‘कान्हा’ अशी नावे या बछड्यांना देण्यात आली. चिठ्ठ्या काढत असताना ‘आदित्य’ नावाची एक चिठ्ठी निघाली. ती पाहताच मुनगंटीवार म्हणाले ‘आदित्य’ नको, दुसरी चिठ्ठी काढा, त्यानंतर ‘आदित्य’ ऐवजी ‘कान्हा’ नाव ठेवण्यात आले.
महापालिका प्राणिसंग्रहालयात पांढरी वाघीण अर्पिताने ७ सप्टेंबरला पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. नागरिकांकडून बछड्यांच्या बारशासाठी नावे मागविण्यात आली होती. दरम्यान, बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात राजकारण आल्यामुळे राजकारणाची पातळी कुठंपर्यंत पोहोचली आहे, यावरून उपस्थितांमध्ये जाेरदार चर्चा होती.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणाले ?
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावामुळेच चिठ्ठी बदलली काय, यावर मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, दोन चिठ्ठ्या एकदम निघाल्या, त्यामुळे एकच काढली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मला तर काहीही आठवत नाही.
नावाच्या राजकारणावर कोण काय म्हणाले?
खा. इम्तियाज जलिल म्हणाले, वाघाच्या बछड्याला काय नाव द्यावे, हा ज्याचा त्याचा विषय असला तरी राजकारण किती खालच्या पातळीवर गेले, हे यातून पाहायला मिळाले.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जंगलातील वाघाच्या बछड्यांचे नामकरण होत नाही. उद्यानामध्ये जन्मलेल्या वाघांना नावे दिली जातात. नाव देताना कोणतेही वाद निर्माण करण्याची गरज नाही.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, हे कोणताही ‘आदित्य’ लपवू शकत नाहीत. आदित्य ठाकरे कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यांना तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही.