राजकारणात तडजोडी होतात, मुलभूत बदलासाठी सांस्कृतिक लढा महत्त्वाचा: प्रकाश सिरसाट
By स. सो. खंडाळकर | Published: November 12, 2022 07:26 PM2022-11-12T19:26:35+5:302022-11-12T19:27:48+5:30
आपल्या प्रत्येक कृतीचा अंतर्भाव हा संस्कृतीशी निगडित आहे.
औरंगाबाद : राजकीय लढ्यापेक्षा सांस्कृतिक लढा महत्त्वाचा असून, सांस्कृतिक लढ्यातून मूलभूत बदल घडताना दिसतात. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. त्यामुळे सांस्कृतिक भूमिका घेऊन आपण ठामपणे लढा उभारावा, अन्यथा बहुजनांच्या वाट्याला ब्रिटिशपूर्व काळातील जीवन आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.प्रकाश सिरसाट यांनी केले.
प्रा.अविनाश डोळस प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित अखिल भारतीय दलित नाट्य परिषद व नाट्य चळवळ : चिंतन शिबिरात ते शुक्रवारी बोलत होते. आपल्या प्रत्येक कृतीचा अंतर्भाव हा संस्कृतीशी निगडित आहे. साधनांचा वापर करून आपण आपले सांस्कृतिक श्रेष्ठत्व सिद्ध करणे, ही दलित थिएटरची मुख्य भूमिका होती. दलित नाट्य चळवळ ही मनोरंजनाकरिता नव्हती, तर ती बाबासाहेबांचा विचार, आंबेडकरी चळवळीचा विचार मांडणारी होती, असेही डॉ.सिरसाट यावेळी म्हणाले.
‘दलित नाट्य चळवळीची भूमिका’ या पहिल्या सत्राचे अध्यक्ष डॉ.संजय मून म्हणाले, ‘प्रा.अविनाश डोळस आणि नाटक यांचे अत्यंत जवळचे नाते होते. दलित रंगभूमी निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.’ डॉ.प्रज्ञा साळवे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. या शिबिराच्या दुसऱ्या सत्रामध्ये ‘दलित नाट्य चळवळ : वाटचाल, सद्यस्थिती व अपेक्षा’ या विषयावर डॉ.प्रभाकर शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्यात प्रकाश त्रिभुवन, देविदास मनोहरे, अशोक गायकवाड, अमोल खरात, प्रज्ञा जाधव आदींनी सहभाग घेतला. प्रा.भारत सिरसाट यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. तिसऱ्या सत्रामध्ये ‘दलित नाट्य चळवळ गतिमान करण्यासाठी कृती कार्यक्रम’ या विषयावर मधुसूदन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यामध्ये विलास गवळी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या सत्राचे सूत्रसंचालन व आभार डॉ.क्षमा खोब्रागडे यांनी केले.