पाण्यावरून रंगले राजकारण; शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 03:04 PM2020-12-12T15:04:56+5:302020-12-12T15:06:04+5:30
कुणी आणली योजना यावरून दोन्ही पक्षात राजकारण सुरु
औरंगाबाद : मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या औरंगाबादच्या जनतेला पाणी केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा असताना १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते जलयोजनेचे उद्घाटन होत आहे. याचवेळी भाजपने ही पाणीयोजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंजूर केल्याचे सांगत याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पाणीयोजना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूर केली असून शहरासह सातारा- देवळाईच्या नागरिकांना पाणी देण्यात येणार असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, भाजपकडून पाणीयोजनेला आमचा विरोध नाही, कारण ही योजनाच भाजपाने आणलेली आहे, असे सांगण्यात येत आहे. शहरासाठी २००८ साली मंजूर झालेल्या समांतर जलवाहिनी योजनेची अंमलबजावणी न होताच ती योजना बंद करण्यात आली. आता ही नवी जलयोजना समांतरच्या दिशेने जाईल, असा सूर भाजपने आळवला आहे. शिवसेनेने मात्र या योजनेची अंमलबजावणी धुमधडाक्यात करण्याचे ठरविले आहे. दोन्ही पक्षांकडून शहरात श्रेयवादाची लढाई असून पोस्टरबाजीही रंगली आहे. हे राजकारण रंगण्यामागे आगामी महापालिका निवडणुकीचे गणित असून आम्हीच जनतेला पाणी दिल्याचे श्रेय घेण्याचा हा वाद दिसून येत आहे.