क्रीडा विद्यापीठाचे राजकारण; पहिले पुणेकरांनी पळविले, आता दुसरे औरंगाबादेत उभारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 01:46 PM2021-01-27T13:46:07+5:302021-01-27T13:47:36+5:30
sports university in aurangabad क्रीडा विद्यापीठ येथून हलविलेले नाही. येथील क्रीडा विद्यापीठ होणारच आहे.
औरंगाबाद: मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील उत्तम क्रीडापटूंना दर्जेदार सरावासाठी औरंगाबादेतील करोडी परिसरातील गट नं. २४ येथील १७० एकर जागेवरील आंतरराष्ट्रीय दर्जाचे पहिले प्रस्तावित क्रीडा विद्यापीठ पुण्याने पळविल्यानंतर आता औरंगाबादमधे करोडीतच दुसरे क्रीडा विद्यापीठ बांधण्याचे आश्वासन देत, त्यासाठी जास्तीची जागा ताब्यात घेण्यात येईल, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी स्पष्ट केले.
तत्कालीन क्रीडा आयुक्त तथा विद्यमान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी क्रीडा विद्यापीठासाठी १३ जिल्ह्यातील क्रीडापटूंची पंढरी म्हणून मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद शहर उदयास येईल, या हेतूने ६०६ कोटींचा तो प्रस्ताव २०१७ मध्ये तयार केला होता. २०११ मध्ये केंद्रेकर यांनी त्या जागेवरील १६९ प्रस्ताव रद्द केले. त्यामध्ये काँग्रेसच्या एका मातब्बर नेत्याच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्तावही रद्द करून टाकला. त्यानंतर राज्यभरात क्रीडा विद्यापीठासाठी एवढी मोठी जागा कुठेही नसल्यामुळे करोडीतील जागा क्रीडा आयुक्तालयाने हेरली. तसेच पथकाने तेथे पाहणी करून ग्रीन सिग्नल दिले. मात्र गेल्या सरकारच्या राजकारणात ते विद्यापीठ रखडले, तर विद्यमान सरकारने पुणेकरांना विद्यापीठ भेट म्हणून दिले.
५० ते ६० एकरमध्ये ते विद्यापीठ करण्याचा सुरूवातीचा प्रस्ताव होता, परंतु अलीकडच्या काळात स्पोर्टस म्हणजे केवळ मैदानी ‘खेळ’ राहिला नाही, त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळालेली आहे. स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडियानंतर क्रीडा विद्यापीठ ही मराठवाड्यातील सर्व स्तरातील खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचे महाप्रवेशद्वार ठरू शकेल.
पालकमंत्री म्हणाले, पुण्यातील निर्णय योग्यच
पालकमंत्री देसाई यांनी सांगितले, क्रीडा विद्यापीठ येथून हलविलेले नाही. येथील क्रीडा विद्यापीठ होणारच आहे. बालेवाडी पुणे येथील तयार सुविधांचा वापर म्हणून तेथे विद्यापीठाचा निर्णय झाला आहे. शासनाचा तो निर्णय योग्यच आहे. क्रीडा विद्यापीठ जिल्ह्यात व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मंजूर जागेत थोडी वाढ करण्याची गरज असून ती संपादित केली जाईल.