विद्यापीठात ऐन हिवाळ्यात तापणार राजकारण; 'प्राधिकरणा'साठी मतदार याद्या अंतिम टप्प्यात
By योगेश पायघन | Published: September 23, 2022 05:21 PM2022-09-23T17:21:00+5:302022-09-23T17:21:29+5:30
रविवारी मध्यरात्री १२.०१ वाजता प्राथमिक मतदार यादी संकेतस्थळावर जाहीर होईल.
औरंगाबाद -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राधिकरणाच्या विविध निर्वाचक गणांच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अर्जांची छाननी प्रक्रीया अखेर पूर्ण झाली. रविवारी मध्यरात्रीनंतर १२.०१ वाजता प्राथमिक मतदार यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार असून त्यानंतर आक्षेप सुनावणीसाठी २० दिवसांचा कालवधी लागणार आहे. त्यानंतर निवडणूकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नोव्हेंबर अखेर विद्यापीठात प्राधिकरण निवडणूकीचे राजकारण तापणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राधिकारणाच्या अध्यापक, प्राचार्य, विद्यापीठ अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी, संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांचे विभागप्रमुख आणि विद्यापीठ पदवीधर या सहा निर्वाचक गणांसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे. ऑनलाईन मतदार अर्ज नोंदणी करून अर्जाची हार्ड कॉपी नंतर दाखल केले. ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्यास १ जूनपासून ११ जुलै २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या अर्जांची छाननी प्रक्रीया पुर्ण झाली असून सोमवारी कोण मतदार बनले, कुणाचे नाव चुकले, कुणाचा अर्ज बाद झाला हे कळणार आहे.
२६ ते ३० सप्टेंबर आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत
अखेर प्राथमिक मतदार यादी तयार करण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आली असून रविवारी मध्यरात्री १२.०१ वाजता यादी संकेतस्थळावर जाहीर होईल. त्यावर कुलसचिवांकडे आक्षेपा दाखल करण्यासाठी २६ ते ३० सप्टेंबर पर्यंत मुदत असेल. त्यानंतर कुलसचिवांकडे आक्षेपांची सुनावणी होईल. आक्षेपांच्या संख्येवर पुढील प्रक्रीया अवलंबुन असेल.
-डॉ. जयश्री सूर्यवंशी, कुलसचिव तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी,
१५ ऑक्टोबरच्या सुमारास दुरूस्त मतदार यादी
या प्रक्रीयेनंतर आलेले आक्षेप नोंदवण्यासाठी नियमानुसार ५ दिवस वेळ देण्यात येईल. त्याची सुनावणी कुलगुरूंसमोर होईल. आक्षेप आणि सुनावणीला २० दिवसांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे. १५ ऑक्टोबरच्या सुमारास दुरूस्त मतदार यादी जाहीर होईल. त्यानंतर लगेचच ३० दिवसांचे निवडणूक वेळापत्रक जाहीर होईल. म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणूका होऊ शकतात.
या अर्जांची झाली छाननी
निर्वाचक गण -ऑनलाईन -हार्डकाॅपी
अभ्यासमंडळ -१५५७ -१५३७
संस्था चालक -२७९ -२०१
प्राचार्य -१३७ -१०३
अध्यापक -३०९९ -२५१३
विद्यापीठ अध्यापक -२२५ -१४५
पदवीधर -५३,१३८ -४३,२३१