पोलखोल! बंदी असतानाही नायलॉन मांजाची घरपोच डिलेव्हरी
By प्रशांत तेलवाडकर | Published: January 13, 2023 12:39 PM2023-01-13T12:39:09+5:302023-01-13T12:40:10+5:30
पोलखोल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने ऑनलाइन मागविला मांजा
औरंगाबाद : नायलॉन मांजाने गळा चिरल्याने देशभरात अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याची दखल घेत खुद्द उच्च न्यायालयाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातली आहे. एवढे नव्हे, तर या घातक मांजाची फेसबुकवरील ऑनलाइन विक्री तत्काळ थांबविण्याचेही आदेश देण्यात आले आहे. आता बाजारात नायलॉन मांजा विक्री होत नसला तरी थेट ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन हा घातक मांजा विकला जातोय. होय, ई-कॉमर्स कंपन्या अजूनही नायलॉन मांजा विक्रीसाठी सतर्क आहेत. याची पोलखोल शहरातील सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे.
इंटरनेटवर ऑनलाइन नायलॉन मांजा विक्री असा शोध घेतल्यास विविध वेबसाइट ओपन होतात. या ई-कॉमर्स कंपन्यांचा भांडाफोड करण्यासाठी शिवशंकर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते अजय दहिफळे यांनी ७ डिसेंबरला वेबसाइटवर जाऊन नायलॉन मांजाची ऑर्डर बुक केली होती. शहरातील डिलिव्हरी कंपनीकडून १० तारखेला हा मांजा घरपोच आला; मात्र त्या वेळीस दहिफळे हे गावाला गेले होते. १३ तारखेला पुन्हा डिलिव्हरी कंपनीचा कर्मचारी त्यांच्या घरी आला. त्यावेळीस दहिफळे यांनी तो नॉयलॉन मांजा घेतला व मोबाइलमध्ये त्याची संपूर्ण व्हिडीओ शूटिंग केली. त्यानंतर सायबर क्राइम विभागात जाऊन त्या संबंधित ई-कॉमर्स कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. ई-कॉमर्स कंपनीने आजपर्यंत देशात किती नायलॉन मांजा विकला, याची माहिती कंपनीकडून द्यावी. या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधित कंपनीला पाठविली नोटीस
तक्रार दाखल होताच गुन्हे शाखेने ऑनलाइन कंपन्यांची माहिती घेणे सुरू केले व ज्या कंपनीने शहरात मांजा पाठविला त्या कंपनीच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठविली आहे.
शहानिशा सुरू
सोशल मीडियावर नायलॉन मांजा विक्रीच्या अनेक साईट बघण्यास मिळत आहेत. यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आली आहे. ‘मिशो’ ही ई-कॉमर्स साईट व त्यातील सत्यता पडताळली जात आहे. शहानिशा करून पुढील कारवाई केली जाईल.
- राहुल चव्हाण, पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम