पोलचीटची पोलखोल! मतदान केंद्राच्या जागी शौचालयाचा फोटो, महिला मतदाराचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 06:20 PM2024-11-12T18:20:48+5:302024-11-12T18:21:29+5:30

याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे

Pollcheet pollkhol! Photo of toilet in place of polling station on poll cheat of women voter | पोलचीटची पोलखोल! मतदान केंद्राच्या जागी शौचालयाचा फोटो, महिला मतदाराचा संताप

पोलचीटची पोलखोल! मतदान केंद्राच्या जागी शौचालयाचा फोटो, महिला मतदाराचा संताप

सिल्लोड: शहरातील एका  भाजपच्या माजी महिला नगरसेविकेच्या मतदार पोलचीटवर मतदान केंद्राच्या फोटो ऐवजी चक्क पुरुषा मुतारीचा फोटो छापून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिल्लोड येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

सिल्लोड विधानसभा मतदार संघ १०४ मधील वार्ड क्रमांक ३ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका रुपाली मनोज मोरेल्लु यांना मंगळवारी सकाळी निवडणूक विभागाने मतदार पोलचीट दिली. सदर पोलचीटच्या मागे मतदान केंद्राच्या रकान्यात चक्क "पुरुष मुतारी" चा फोटो छापलेला आढळून आला. या संतापजनक प्रकारावर त्यांनी मुख्य निवडणूक निर्वाचन अधिकारी महाराष्ट्र राज्य व सिल्लोड येथील निवडणूक निर्णय अधिकारीसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. 

सदर प्रकरण अत्यंत गंभीर व विकृत स्वरूपाचे आहे. सदर प्रकारामुळे महिलांना शरमेने खाली मान घालायची वेळ आली आहे. सदर प्रकार एक जागरूक मतदार व माजी नगरसेविका म्हणून मी कदापी खपवून घेणार नाही. ज्या अधिकाऱ्यांनी सदर फोटो मतदार पोलचीटवर छापले आहेत, अशा सर्वांवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार संपूर्ण सिल्लोड शहरात चर्चेचा विषय झाला आहे. अशा प्रकारचे किती मतदार पोलचीटचे सिल्लोड शहरात वाटप करण्यात आले आहे याची माहिती घेण्यात येत आहे. 

अॅपमध्ये फोटो अपलोड करताना चूक
शासनाने पोलचिटसाठी एक अॅप दिला आहे. संबंधित बीएलओ यांना मतदान केंद्राचे फोटो अपलोड करायचे होते. मतदान केंद्रातील चारी बाजूचे फोटो काढल्यानंतर एका बीएलओकडून चुकीने मुतारीचा फोटो अपलोड झाला. हे लक्षात आल्यानंतर तो फोटो डीलेट करून दुसरी पोलचिट देण्यात आली आहे. हा प्रकार गंभीर असून संबंधीत बीएलओस कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
- लतीफ पठाण निवडणूक निर्वाचन अधिकारी सिल्लोड.

Web Title: Pollcheet pollkhol! Photo of toilet in place of polling station on poll cheat of women voter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.