पदवीधरांसाठी मराठवाड्यात ८१३ केंद्रांवर होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 05:41 PM2020-11-04T17:41:33+5:302020-11-04T17:42:03+5:30
या निवडणुकीत ६३ साहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहेत.
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी ८१३ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार असून त्याअनुषंगाने विभागीय प्रशासनाने सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २०६ मतदान केंद्र आहेत. २ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पूर्ण सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत विभागीय प्रशासनाने आदेशित केले आहे. आचारसंहिता सूचना, अनुसरण पद्धत, कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी आदींबाबत विभागात सूचना करण्यात आल्या आहेत.
या निवडणुकीत ६३ साहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहेत. दरम्यान पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अमलात आणण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आयोगाच्या सूचनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी सूचित केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकारी यांची बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार आणि जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्ह्याचे नाव मतदान केंद्र
औरंगाबाद २०६
जालना ७४
परभणी ७८
हिंगोली ३९
नांदेड १२३
लातूर ८८
उस्मानाबाद ७४
बीड १३१
एकूण ८१३