औरंगाबादमध्ये विद्यापीठ अभ्यास मंडळासाठी होणार शनिवारी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 08:09 PM2018-02-16T20:09:43+5:302018-02-16T20:10:39+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २० अभ्यास मंडळांसाठी शनिवारी (दि.१७) चार जिल्ह्यातील आठ केंद्रांवर मतदान होणार आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २० अभ्यास मंडळांसाठी शनिवारी (दि.१७) चार जिल्ह्यातील आठ केंद्रांवर मतदान होणार आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात तीन, जालना १, बीड २ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात २ मतदान केंद्रांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवडणूकीनंतर नामनिर्देशन करण्यावरून उत्कर्ष पॅनल आणि विद्यापीठ विकास मंचमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. विद्यापीठ प्रशासनाने रातोरात निवडणूकीपूर्वीच अभ्यासमंडळावर नियुक्त्या केल्या होत्या. याला उत्कर्षतर्फे आक्षेप घेण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या २० अभ्यास मंडळांसाठी शनिवारी मतदान होत आहे. यात प्रत्येक अभ्यासमंडळात ३ सदस्य निवडूण येणार आहेत. तर पाच जणांनी नामनिर्देशन कुलगुरू डॉ. बी.ए . चोपडे यांनी केले आहे. विद्यापीठातील विभागप्रमुख अभ्यास मंडळाचे पदसिद्ध सदस्य असणार आहेत. एकुण ६० जागांसाठी १२८ उमेदवार रिणांगणात आहेत. उर्वरित अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी सांगितले. तसेच चार जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रावरील कर्मचारी शुक्रवारीच रवाना झाले आहेत.
मतदारांना सुट्टी जाहीर
अभ्यास मंडळाच्या निवडणूकीत महाविद्यालयातील विविध विषयांच्या विभागप्रमुखांनाच मतदान असते. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विभागप्रमुखांना शनिवारी सुट्टी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी कुलगुरूंच्या आदेशाने काढले आहे.