प्रदूषण करणारी वाहने रस्त्यांवर धावणार नाहीत

By | Published: December 2, 2020 04:04 AM2020-12-02T04:04:38+5:302020-12-02T04:04:38+5:30

प्रदूषण प्रमाणपत्रातील गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारचे ऑनलाईन नियोजन नितीन अग्रवाल लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : रस्त्यांवर धूर उडवीत धावणारी ...

Polluting vehicles will not run on the roads | प्रदूषण करणारी वाहने रस्त्यांवर धावणार नाहीत

प्रदूषण करणारी वाहने रस्त्यांवर धावणार नाहीत

googlenewsNext

प्रदूषण प्रमाणपत्रातील गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारचे ऑनलाईन नियोजन

नितीन अग्रवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रस्त्यांवर धूर उडवीत धावणारी वाहने आता इतिहासजमा होतील. सरकारने प्रदूषण तपासणी न करता रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांचे पंजीकरण रद्द करण्याची तयारी केली आहे. एवढेच नाही तर प्रदूषण तपासणी झाल्याची बनावट प्रमाणपत्रे रोखण्यासाठी प्रदूषण तपासणीही ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते परिवहन मंत्रालयाने नव्या नियमांचा मसुदा तयार केला आहे. त्यावर सर्व संबंधितांकडून सूचना व आक्षेप मागितले आहेत. सूचना व आक्षेपांसह जानेवारी २०२१ च्या शेवटी ते लागू केले जाईल. नव्या नियमांतर्गत वाहनाच्या सर्व्हिससह प्रदूषण तपासणीही अनिवार्य असेल. वाहन तपासणी करणाऱ्यालाही प्रदूषण तपासणीचे आदेश देण्याचे अधिकार दिले आहेत. तो असा आदेश लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देऊ शकतो. एक आठवड्याच्या आत वाहनाची प्रदूषण तपासणी करून प्रमाणपत्र मिळविणे अनिवार्य असेल. असे न झाल्यास वाहनाची नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे.

मंत्रालयातील सूत्रानुसार सगळी प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे तपासणी केंद्र, वाहनाची व वाहन मालकाची आणि प्रदूषण प्रमाणपत्राची माहिती राष्ट्रीय स्तरावर बनविल्या गेलेल्या मोटर वाहन रजिस्टरमध्ये घेतली जाईल. वाहन मालकाचा मोबाईल नंबरही प्रदूषण केंद्रावर नोंद केला जाईल. त्यावर एसएमएसच्या माध्यमातून एक कोड पाठवून दुजोरा घेतला जाईल. या कोडच्या माध्यमातून वाहनाची प्रदूषण तपासणी प्रक्रिया सुरू होईल. निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना थेट नकारात्मक गुण दिले जातील. तपासणी केंद्रावर त्यात हस्तक्षेप करणे शक्य होणार नाही.

---------------------

‘वर्क फ्राॅम हाेम’ने वाढविले कामाचे तास

भारतीयांचे ३२ मिनिटे वाढले, सर्वेक्षणातून माहिती

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : लाॅकडाऊनच्या काळात जगभरात वर्क फ्राॅम हाेम संस्कृती रुजली. अनेकांना हा पर्याय आवडला. परंतु घरातून काम करताना भारतातील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास ३२ मिनिटांनी वाढले आहेत. ‘अल्टएशियन’ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समाेर आली आहे.

या सर्वेक्षणात ६५ देशांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता. बहुतांश कर्मचारी वेळेच्या आधी लाॅगिन करायचे आणि बराच वेळ उशिराने लाॅग आऊट करायचे. या कामाचा आढावा घेतल्यास इस्रायलमध्ये सर्वाधिक ४७ मिनिटांनी कामाची वेळ वाढली आहे, तर भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी ३२ मिनिटे कामाची वेळ वाढलेली आहे. जपानमध्ये १६, तर दक्षिण काेरियात सर्वात कमी ७ मिनिटे वाढली आहेत.

घरातून काम केल्यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ वाचला आहे, परंतु त्याचा फारसा फायदा झालेला नाही. सुरुवातीच्या काळात इतर कामांसाठी वेळ मिळायचा. परंतु आता सातत्याने संगणकासमाेरच राहावे लागते, अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी दिली. सर्वेक्षणानुसार, सकाळी आणि संध्याकाळी जास्त काम व्हायचे, तर दुपारी त्यात शिथिलता येत हाेती. कर्मचाऱ्यांना कामाच्या आणि वैयक्तिक वेळेत फरक करणे कठीण झाले. निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांनी ही प्रतिक्रिया दिली. काम संपल्यानंतरही २३ टक्के कर्मचारी कामाबद्दलच विचार करायचे.

चाैकट

वर्क फुल अवर्स

घरातून काम करण्याच्या अनुभवाबद्दल काही कर्मचाऱ्यांनी तिखट प्रतिक्रियाही नाेंदविल्या आहेत. ‘वर्क फ्राॅम हाेम’ नव्हे, तर ‘वर्क फुल अवर्स’ अशी नवी व्याख्या तयार झाल्याचे कर्मचारी म्हणतात. दरराेज १२ तास काम केल्यानंतर रात्री पुन्हा उशिरापर्यंत दैनंदिन अहवाल द्यावा लागताे, असे कर्मचारी सांगतात.

...........

सीमेवरील चौक्या, गावांवर पाकिस्तानचा गोळीबार

रात्रभर मारा : सीमावर्ती भागातील नागरिकांचे जगणे झाले मुश्कील

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्या व गावांवर पाकिस्तानी रेंजर्सनी शनिवारी रात्रभर गोळीबार करून पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन केले.

अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, शनिवारी रात्री ९.५० च्या सुमारास हिरानगर सेक्टरमधील करोल कृष्णा, मन्यारी व पंसारमध्ये सीमेपलीकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. याला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जोरदार प्रत्युत्तर दिले. रविवारी पहाटे ४.१५ वाजेपर्यंत हा गोळीबार सुरू होता. यात भारताच्या बाजूने कसलीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

पाकिस्तानी जवानांनी मागील आठ महिन्यात युद्धबंदीचे वारंवार उल्लंघन करून सीमावर्ती भागातील नागरिकांचे जगणे मुश्कील केले आहे. मन्यारी गावातील रहिवासी धरम पॉल यांनी म्हटले आहे की, आम्हाला जगणे फार मुश्कील झाले आहे. आम्ही प्रत्येक रात्री पाकिस्तानी गोळीबारातून जीव वाचविण्यासाठी भूमिगत बंकरमध्ये जात आहोत. पाकच्या गोळीबारात व उखळी तोफांच्या माऱ्यात मागील दोन वर्षांत अनेक घरांचे नुकसान झाले आहे. पाकने आम्हाला जीवन जगणे अवघड केले आहे.

सीमावर्ती भागातील लोकांचे म्हणणे कुणीच ऐकून घेत नाही. आम्ही गोळीबार, उखळी तोफांचे हल्ले यांचा मारा सहन करूनही अद्याप टिकून आहोत.

...................

गोळीबार करून ड्रोनसारखी वस्तू परतविली

बीएसएफने शनिवारी सकाळी जम्मू जिल्ह्यातील अर्निया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारतीय हद्दीत घुसखोरी करू पाहणाऱ्या संशयित ड्रोनवर गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय जमिनीकडे येणाऱ्या ड्रोनसारख्या उडत्या वस्तूवर गोळीबार केला. त्यानंतर ती वस्तू पाकिस्तानी सीमेकडे परत गेली. सीमा सुरक्षा दल सीमेवर कडक नजर ठेवून आहे. कारण मागील अनेक महिन्यापासून पाकिस्तान शस्त्रास्त्रे व अमलीपदार्थ भारतात टाकण्यासाठी ड्रोनचा वापर करीत आहे.

.........

बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरासमोर जोरदार निदर्शने

इस्रायल : कोरोना हाताळण्यात अपयश व भ्रष्टाचारामुळे राजीनामा देण्याची मागणी

येरुसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांच्या घरासमोर शनिवारी रात्री जोरदार निदर्शने करण्यात आली. मागील महिन्यापासून हे आंदोलक निदर्शने करीत आहेत.

सुमारे १,००० निदर्शकांनी ही निदर्शने केली. नेतन्याहू यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप व इस्रायलमध्ये कोरोना महामारीशी लढा देताना त्यांना आलेले अपयश, यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे देशात दोनवेळा लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. लाखो लोक बेरोजगार झाले. या आंदोलकात अनेक लोक असे आहेत, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या. देशात अनावश्यक लॉकडाऊन करण्यात आले होते, असा त्यांचा आरोप आहे.

देशात मागील सहा महिन्यापासून आंदोलक निदर्शने करीत आहेत. तथापि, सध्याच्या थंडीमुळे आंदोलकांच्या संख्येत घट झाली आहे, परंतु आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. निदर्शनाच्या वेळी सर्व निदर्शकांनी कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क घातले होते, परंतु डिस्टन्सिंगचे पालन मात्र केलेले दिसून आले नाही.

निदर्शने करताना लोकांनी हातांमध्ये गुलाबी रंगाचे झेंडे घेतलेले दिसत होते. हे झेंडे मागील अनेक महिन्यापासून आंदोलकांचे प्रतीक बनले आहेत. काहींनी हातांमध्ये पाणबुड्यांचे मॉडेल घेतलेले होते. जर्मन पाणबुड्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्यात नेतन्याहू अडकलेले आहेत, असेही आरोप केला जात आहे. तथापि, या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश संरक्षणमंत्री बेनी गँटझ यांनी दिले आहेत. नेतन्याहू हे देशाच्या पंतप्रधानपदी प्रदीर्घ कालावधीपासून असून, या कालावधीत त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निदर्शक करीत आहेत.

.........

भारतीय सीमेजवळ चीनच्या कारवाया चिथावणी देणाऱ्या

कृष्णमूर्ती : अमेरिका भारताच्या बाजूने भक्कमपणे उभी

वॉशिंग्टन : भारतीय सीमेजवळ चीनच्या सुरू असलेल्या कारवायांवर चिंता व्यक्त करीत अमेरिकेतील एका प्रभावशाली खासदाराने म्हटले आहे की, हे सर्व चिथावणी देणारे आहे. दक्षिण चीन सागरात चीनचे जसे वर्तन आहे, तसेच येथेही आहे, असेही स्पष्ट केले आहे.

पूर्व लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) भारत-चीन देशांदरम्यान मागील मे महिन्यापासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एलएसीलगत आपले सैन्य मोठ्या प्रमाणावर तैनात केले आहे. तसेच या कालावधीत दोन्ही देशात चर्चाही सुरू आहे, परंतु अद्याप त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

डेमोक्रॅटिक पार्टीचे खासदार व अमेरिकी सभागृहाच्या गुप्तचरविषयक स्थायी प्रवर समितीपर्यंत पोहोचणारे पहिले भारतीय-अमेरिकी सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे की, चीनचे हे वर्तन चिथावणीखोर आहे. असे वर्तन त्या देशाने समुद्रीशक्ती वाढवितानाही केलेले आहे. उपग्रहांच्या द्वारे घेतलेल्या छायाचित्रांद्वारे चीनच्या हालचालींची माहिती मिळते.

सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधी सभेत निवडून गेलेले कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे की, अमेरिका भारताच्या बाजूने उभा आहे. यापूर्वीचे ट्रम्प शासन व आगामी बायडेन शासनही हिंद-प्रशांत क्षेत्रात भारताच्या बाजूने भक्कमपणे उभे आहे.

काँग्रेसच्या या खासदाराने म्हटले आहे की, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेच्या मालाबार कवायतींद्वारे हाच संकेत देण्यात आला आहे की, दोन्ही लोकशाहीवादी देश एकमेकांच्या बाजूने उभे राहतील व नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला पाठिंबा देत राहतील. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारताचे जुने मित्र आहेत व ते भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील.

ते म्हणाले की, कमला हॅरिस यांच्या भारतीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर हे संबंध आणखी मजबूत बनविले पाहिजेत. नवनिर्वाचित विदेशमंत्री अँटनी ब्लिंकन हे भारताचे जुने मित्र आहेत. त्यांना या भागाची चांगली माहिती आहे. नव्या सरकारच्या नेतृत्वात भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर नेण्यात येतील. आम्ही डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षांचा हा दृष्टिकोन कायम ठेवू व भारताच्या बाजूने उभे राहू. चीनसह कोणत्याही शेजारी देशाकडून होणाऱ्या सैन्य कारवाईच्या विरोधात आहोत. कोरोनाशी लढा, ही सध्या सर्वांत मोठी प्राथमिकता आहे, असेही ते म्हणाले.

........

आसाममध्ये एक कोटीचा गांजा जप्त

दीफू : आसामच्या कार्बी अँगलॉँग जिल्ह्यातून पोलिसांनी रविवारी एक कोटी रुपये किमतीचा सहा क्विंटल गांजा जप्त केला. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी वाहनांची तपासणी करून नागालँडमधून आलेल्या एका ट्रकमधून हा गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत एक कोटी सोळा लाख रुपये आहे. पोलिसांना पाहून ट्रक चालक आणि त्याचा मदतनीस फरार झाला. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

२०० रुपयासाठी युवकाची गोळ्या घालून हत्या

अलिगड : केवळ २०० रुपयासाठी एका युवकाची भरबाजारात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिव्हिल लाईन बाजारात शनिवारी ही थरारक घटना घडली. अन्सार अहमदचे पंक्चरचे दुकान होते. आरोपी आसिफ त्याच्या दुकानावर आला आणि २०० रुपये मागितले. अन्सारने नकार दिल्याने आरोपीने पिस्तूल काढून त्याच्या डोक्यात गोळी झाडली, नंतर आरोपी मोटरसायकलवरून पसार झाला.

पत्रकाराच्या पत्नीने दिला आत्मदहनाचा इशारा

बलरामपूर : शनिवारी पत्रकार आणि त्याच्या मित्राचा संशयास्पदस्थितीत होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी पत्रकार राकेशसिंह निर्भिक यांची पत्नी विभा सिंहने आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. दोन दिवसात छडा लावून आरोपींना अटक न केल्यास मुलांसह आत्मदहन करीन, असे तिने सांगितले. पोलिसांनी दोन दिवसात घटनेचा छडा लावण्याची ग्वाही दिली आहे. तथापि, पोलिसांवर भरवसा नसल्याचे तिने म्हटले आहे. मुलाची हत्या करण्यात आल्याचा आरोप राकेशच्या वडिलांनी केला आहे.

नायजेरियात संशयित अतिरेक्यांच्या हल्ल्यात ४० शेतकरी ठार

मैदगुडी : बोको हराम संघटनेच्या संशयित अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० शेतकरी ठार झाले. नायजेरियाच्या उत्तरेकडील बोर्नो राज्यात ही घटना घडली. बोर्नो समुदाय धानाची शेती करतात. १३ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान होत असताना ही घटना घडली. शेतकरी धानाची कापणी करीत त्यांना एकत्रित करीत असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हत्याकांडाला शेतकरी संघटनेचे नेते मलाम झबारमरी यांनी दुजोरा दिला आहे. मृतांची संख्या वाढू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

माय-लेकीची हत्या, दोन आरोपींना अटक

बलिया : माय-लेकीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. बहिणीचे अनैतिक संबंध असल्याचा दोघांना संशय होता. त्यामुळे दोघा भावांनी आई आणि बहिणीची हत्या केली. अहिरौला गावात ही घटना घडली. दोघांना रविवारी अटक करण्यात आली. दोन्ही भाऊ आई आणि बहिणीपासून वेगळे राहत होते. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

दोन भावंडांचा तळ्यात बुडून मृत्यू

बलिया : फुले तोडण्यासाठी तळ्यात उतरलेल्या दोन भावंडांचा दलदलीत अडकल्याने बुडून मृत्यू झाला. रविवारी ही दुर्दैवी घटना घडली. दोन जण बुडत असल्याचे पाहून तळ्याकाठी थांबलेल्या त्यांच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. घटना कळल्यानंतर पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

चित्रकूटमध्ये गर्भवती महिलेची हत्या

चित्रकूट (उत्तर प्रदेश) : रविवारी पहाटे झोपेमध्ये असलेल्या एका गर्भवती महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना खजुरिहा कला गावात घडली. तिला तीन वर्षांचा मुलगाही आहे. सकाळी खाटेवर रक्ताळलेल्या स्थितीत तिचा मृतदेह आढळला. तिच्या पतीने एक महिला व गावातील एका युवकाविरुद्ध तक्रार दिली असून, हत्येचे कारण मात्र सांगितले नाही. अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.

जम्मूत ४२ वर्षांच्या व्यक्तीची हत्या

जम्मू : धारदार शस्त्राने जम्मूत एका ४२ वर्षांच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला काही तासात अटक करण्यात आली. काही वादातून ही घटना घडली. शब्बीर अहमदला सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

लॉकडाऊनविरुद्ध निदर्शने, १५५ जणांना अटक

लंडन : लॉकडाऊनविरोधात निदर्शने करणाऱ्या १५५ जणांना अटक करण्यात आली. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांना एकत्र जमा होण्यास प्रतिबंध असतानाही शनिवारी निदर्शने करण्यात आली. सेव अवर राईटस् यूकेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ३१ ऑक्टोबरपासून दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. दुसरा लॉकडाऊन ५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत लागू असेल.

उत्तराखंडमध्ये सूर्यधर तलावाचे उद्घाटन

डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी रविवारी दोईवालानजीक असलेल्या सूर्यधर तलावाचे उद्घाटन केले. या तलावाने पिण्याच्या पाण्यासह जवळपास २० गावातील शिवार सिंचित होईल. या तलावातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी बारमाही पाणी मिळेल. याशिवाय भविष्यात पर्यटन जलक्रीडेचे ठिकाण म्हणून ओळखले जाईल, असे त्यांनी सांगितले.

.........

Web Title: Polluting vehicles will not run on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.