'बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प ‘वॉटरग्रेस’ला द्यावा'; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मनपावर ‘लेटर बॉम्ब’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 19:23 IST2025-01-23T19:22:26+5:302025-01-23T19:23:44+5:30
मनपाने गोवा येथील बायोटेक कंपनीला काम सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत

'बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प ‘वॉटरग्रेस’ला द्यावा'; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मनपावर ‘लेटर बॉम्ब’
छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया न करणाऱ्या ‘वॉटरग्रेस’ कंपनीची मनपाने हकालपट्टी केली. निविदा पद्धतीने मनपाने गोवा येथील बायोटेक कंपनीची निवड केली. त्यानंतर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपावर ‘लेटर बॉम्ब’ टाकून, प्रकल्प जुन्या वॉटरग्रेस कंपनीला द्यावा, असा अजब सल्ला दिला.
शहर आणि परिसरातील वैद्यकीय कचरा संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करण्याचे काम मनपाने २००० मध्ये नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला दिले होते. कंपनीच्या कराराची मुदत २०२२ मध्ये संपली. मनपाने कंपनीला मुदतवाढ न देता निविदा प्रक्रिया केली. त्यात गोवा येथील बायोटेक कंपनी सर्वोत्कृष्ट ठरली. मनपाने कंपनीला काम सुरू करण्याचे निर्देशही दिले.
दोन दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिका प्रशासकांच्या नावे पत्र पाठवून वैद्यकीय कचरा प्रकल्प वॉटरग्रेस कंपनीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.
कायदेशीर सल्ला घेणार
पत्राच्या अनुषंगाने महापालिका सर्व कायदेशीर बाबी तपासून व कायदेशीर सल्लागाराचे मत लक्षात घेऊन उत्तर देणार आहे. अध्यक्षांनी आपल्या पत्राचा फेरविचार करावा, अशी विनंती करण्यात येईल.
जी. श्रीकांत (प्रशासक, महापालिका)
मनपाने करारच रद्द केला...
१) वॉटरग्रेस कंपनीसोबत केलेला करारच रद्द केला आहे. करारच रद्द झालेला असल्यामुळे आता कोणतीही वैधता राहत नाही.
२) वॉटरग्रेस कंपनी महापालिकेच्या अखत्यारीत एक व्हेंडर म्हणून काम करीत होती. कंपनीची व्हेंडरशिप रद्द झाली आहे.
३) कंपनीने केलेले एमओयु ग्राह्य धरता येणार नाहीत, असे मनपातील सूत्रांनी नमूद केले.