प्रदूषण नियंत्रण पथकाने केली परदेशवाडी तलावाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:19 PM2018-12-29T23:19:06+5:302018-12-29T23:19:19+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने शनिवारी परदेशवाडी तलावाला भेट देऊन पाहणी केली, तसेच तलावातील पाण्याचे नमुने घेतले.
वाळूज महानगर : ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने शनिवारी परदेशवाडी तलावाला भेट देऊन पाहणी केली, तसेच तलावातील पाण्याचे नमुने घेतले.
या परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतकºयांचा सिंचनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी परदेशवाडी तलाव बांधण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न मार्गी लागत असल्याने परदेशवाडी, रामराई, जोगेश्वरी, वाळूज आदी गावांना या तलावाचा मोठा फायदा झाला. आजही या तलावातील पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जात आहे; मात्र काही वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांतील सांडपाणी सोडले जात असल्याने तलावातील पाणी दूषित झाले आहे.
दूषित पाण्यामुळे काही वर्षांपूर्वी पाण्यातील मासे मृत पडले होते, तसेच पाणी पिल्याने काही म्हशी दगावल्या होत्या. तलावातील दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे व शेतीचा पोत खराब होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १३ डिसेंबर रोजी प्रकाशित केले होते, तसेच सुरेश सरदार, गणेश कांबळे, दत्ता गाडेकर व विलास पठारे यांनीही प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जागे झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी राजेश आवटी यांनी पथकासह गुरुवारी परदेशवाडी तलावाला भेट देऊन पाहणी केली. तलावात मिसळणाºया सांडपाण्याचे नमुने घेतले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राठी, सुरेश सरदार, दत्तू गाडेकर, गणेश कांबळे, श्याम नरवडे आदींची उपस्थिती होती.
ग्रामपंचायतींना बजावणार नोटिसा
नमुने घेतलेले पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. सदरील पाहणी अहवाल प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. याप्रकरणी परिसरातील जोगेश्वरी व रांजणगाव ग्रामपंचायतीला नोटिसा बजावण्यात येणार असलयाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी राजेश आवटी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.