औरंगाबादच्या प्रदूषण पातळीत १० ते १५ टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:46 AM2018-04-26T00:46:33+5:302018-04-26T00:47:51+5:30
वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर टाकून देणे आणि नंतर त्या कचऱ्याला काडी लावून पेटवून देण्याचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले असून, यामुळे तापमान तर वाढतेच आहे; पण शहराची प्रदूषण पातळी वाढण्यासही हातभार लागत आहे.
रुचिका पालोदकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर टाकून देणे आणि नंतर त्या कचऱ्याला काडी लावून पेटवून देण्याचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले असून, यामुळे तापमान तर वाढतेच आहे; पण शहराची प्रदूषण पातळी वाढण्यासही हातभार लागत आहे. उन्हाळ्यात कोरड्या हवेमुळे शहराची प्रदूषण पातळी वाढतच असते. त्याचप्रमाणे उन्हाळा सुरू झाल्यापासून यामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असून, यासाठी अनेक घटकांप्रमाणे कचरा जाळणे हा घटकही कारणीभूत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी ही समस्या आता शहरवासीयांच्या आरोग्यावरही घातक परिणाम करीत आहे.
शहरात कचºयाची समस्या निर्माण झाल्यापासून प्रत्येक वॉर्डात फिरून कचरा गोळा करणारे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी एकत्रित कचरा घेण्यास नकार देतात. कचरा वर्गीकरण करून द्यावा, एवढी या लोकांची अपेक्षा आहे. मात्र अनेक भागांतील नागरिकांना या गोष्टीचा कंटाळा असल्यामुळे किंवा काही भागांत घंटागाडी पोहोचत नसल्यामुळे नागरिक हा कचरा रस्त्याच्या दुभाजकांवर किंवा मग परिसरातील मोकळ्या जागेवर जमा करतात आणि सर्रास पेटवून देतात.
सायंकाळी वातावरण थंड झाल्यावर किंवा अगदी पहाटेच हा कचरा जाळला जातो. कचरा जाळताना त्यात ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी वेस्ट, प्लास्टिक चे तुकडे, अशा सर्वच प्रकारचा कचरा एकत्र असतो. एकदा कचरा जाळल्यानंतर पुढे चार ते पाच तास तो धुमसत राहतो आणि त्या धुरातून बाहेर पडणारे विषारी वायू पर्यावरणाचा समतोल बिघडविण्याचे काम करतात.
उन्हाळा असल्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होऊन वातावरण थंड झाले की, अनेक ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी आणि लहान मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. पण जळणाºया कचºयामुळे मात्र नाक बंद करूनच बाहेर पडावे लागत असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले.
आरोग्यासाठी धोकादायक
मोकळ्या हवेत कचरा जाळल्यामुळे त्यातून डायआॅक्झिन्स, सल्फर, पारा, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड, अर्सेनिक, असे घातक वायू वातावरणात प्रवेश करतात. हे वायू श्वसनासोबत थेट शरीरात जाऊन श्वसन क्रियेवर परिणाम करतात. यामुळे हृदयावरही परिणाम होऊ शकतो. दमा, अस्थमा हे आजार असणाºयांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि लहान बालकांसाठी हे वायू अत्यंत घातक आहेत. डोळे चुरचुरणे, मळमळणे, डोके जड पडणे, अंगावर रॅश येणे, असे आजारही या धुरामुळे होऊ शकतात.