भिवधानोरा-धनगरपट्टी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:04 AM2021-06-21T04:04:32+5:302021-06-21T04:04:32+5:30
कायगाव : भिवधानोरा ते धनगरपट्टी या डांबरी रस्त्याची गेल्या दहा वर्षांच्या काळात एकदाही दुरुस्ती झाली नाही. या डांबरी रस्त्यावरील ...
कायगाव : भिवधानोरा ते धनगरपट्टी या डांबरी रस्त्याची गेल्या दहा वर्षांच्या काळात एकदाही दुरुस्ती झाली नाही. या डांबरी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. आता मात्र या रस्त्याचे दुरुस्ती शक्य नाही, तर रस्ताच नव्याने तयार करावा लागणार आहे.
२०१०-२०११ साली हा डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता. आता या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या २० वर्षांत या रस्त्याचे दोनदा डांबरीकरण करण्यात आले. १९९९-२००० साली सर्वप्रथम या ७ किमी रस्त्याचे डांबरीकरण झाले. त्यानंतर तब्बल १० वर्षांनी २०१०-११ ला या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर करण्यात आला. आता त्या कामालाही १० वर्षे लोटली आहेत. भिवधानोरा आणि अगरवाडगाव परिसरातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांची धनगरपट्टी शिवारात शेती असल्याने त्यांना दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. उसाच्या हंगामात याच रस्त्यावरून उसाच्या गाड्या भरून जातात. तसेच धनगरपट्टी येथील नागरिकांसाठी दुसरा रस्ताच नसल्याने त्यांनाही याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मालवाहतूकही येथूनच होते. या सर्व कारणांमुळे आणि रस्त्यावरील रहदारीमुळे रस्ता सुस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या कामाबद्दल अनेकदा संबंधित विभागाला विनंती करूनही उपयोग झाला नाही. हा रस्ता अनेक ठिकाणी दुतर्फा बाजूने खचला असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची खडी निघून गेली आहे. शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी जवळपासच्या शेतकऱ्यांनी वर्गणी करून रस्त्यावर मुरूम टाकला होता, ता मुरूमसुद्धा उखडला आहे.
चौकट
नागरिकांची आंदोलनाची तयारी
आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस पडला की खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहतो. रात्री-बेरात्री येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याचा वापर करणारे तीन गावांतील नागरिक आता सरकारी दिरंगाईला वैतागले आहेत. लवकरच रस्त्याचे काम हाती घेण्यात आले नाही तर आंदोलनाची तयारी नागरिकांनी सुरू केली आहे.
200621\1633-img-20210620-wa0027.jpg
फोटो :
भिवधानोरा-धनगरपट्टी डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहे.
(तारेख शेख)