शहरातील नाट्यगृहांची बकाल अवस्था; प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 07:08 PM2018-10-23T19:08:57+5:302018-10-23T19:13:08+5:30
संत तुकाराम नाट्यगृह व संत एकनाथ रंगमंदिराची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे.
औरंगाबाद : सांस्कृतिक वारसा लाभलेले हे शहर; परंतु या शहरातील रसिक श्रोत्यांची सांस्कृतिक भूक भागविणारी नाट्यगृहे आज उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. प्रामुख्याने संत तुकाराम नाट्यगृह व संत एकनाथ रंगमंदिराची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. याकडे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे, ना शासन-प्रशासनाचे.
तब्बल वर्ष-दीड वर्षापासून संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी १५ आॅगस्ट रोजी हे नाट्यगृह रसिकांसाठी खुले केले जाणार होते; पण अजूनही हे नाट्यगृह भग्नावस्थेत पडून आहे. या नाट्यगृहामध्ये खुर्च्या बसविण्यात आलेल्या नाहीत. स्वच्छतागृहे दुरुस्त केलेली नाहीत. या नाट्यगृहाच्या दुरवस्थेबद्दल नाट्यकलाकार प्रशांत दामले व सुमित राघवन यांनी गेल्या वर्षी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व सरकारचे वाभाडे काढले होते.
सुमित राघवन आणि टीम ‘एक शून्य तीन’ या नाटकाच्या प्रयोगासाठी संत एकनाथ रंगमंदिरात पोहोचली होती. तेव्हा रंगमंदिराची दुरवस्था पाहून ते अत्यंत व्यथित झाले. रंगमंचावरील मोडक्या लाकडी फळ्या, फ्लोरिंगला पडलेल्या भेगा, मेकअप रूममधील अस्वच्छता, दुर्गंधीमुळे त्यांना चांगलाच मनस्ताप झाला होता. त्यावेळी सुमित राघवनने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रंगमंदिराचे विदारक चित्र जगासमोर मांडले होते. त्यानंतर संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणासाठी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.
महापालिकेने यात ५० लाख रुपयांची भर घातली. अडीच कोटी रुपयांमधून नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात आता वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, नूतनीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
खाजगी संस्थेकडे देण्याचा घाट
सिडकोतील नाट्यगृहाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. सिडकोने २०१० मध्ये मनपाकडे नाट्यगृह हस्तांतरित केले. त्यानंतर महापालिकेने या नाट्यगृहाचे संत तुकाराम महाराज नाट्यगृह असे नामकरण केले. आता महापालिकेला हे नाट्यगृह सांभाळणे जड झाले आहे. त्यामुळे ते खाजगी संस्थेकडे देण्याचे षङ्यंत्र रचले जात आहे. या नाट्यगृहाची महापालिकेकडून नियमित देखभालही होत नसल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खुर्च्या, वातानुकूलित यंत्रणा बंद पडलेली, तुंबलेली स्वच्छतागृहे, सिलिंग कोसळलेले, ग्रीन रूमची वाट लागलेली, असे भयाण चित्र नाट्यगृहात पाहायला मिळते.