मध्यवर्ती बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांत संतापाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 06:58 PM2018-10-30T18:58:06+5:302018-10-30T18:58:24+5:30
साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांतून संताप व्यक्त होत आहे.
औरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून एसटी महामंडळाला महिन्याकाठी ५ कोटींवर उत्पन्न मिळत आहे. तरीही बसस्थानकाच्या नूतनीकरणासह प्रवासी सुविधा देण्याकडे कानाडोळा केला जात आहे. साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांतून संताप व्यक्त होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानक आगाराच्या १४८ बस असून यातून दररोज १६ ते २० हजार प्रवाशांची वाहतूक होते. इतर विभागांच्या ये-जा करणाऱ्या बसेसचा आकडा दिवसभरात सातशेच्या घरात जातो. सप्टेंबर महिन्यात मध्यवर्ती बसस्थानकातून ५.६३ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. हा आकडा अनेकदा ६ कोटींवर जातो. एकीकडे महिन्याला कोट्यवधींचे उत्पन्न गोळा केले जात आहे, तर दुसरीकडे बसस्थानकाची दुरवस्था दूर करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे दिसते. ज्यांच्यामुळे हे उत्पन्न मिळते, त्या प्रवाशांनाच मूलभूत सोयीसुविधाही दिल्या जात नाही.
स्थानकात आल्यावर बससाठी तासन्तास वाट पाहत बसणाऱ्या प्रवाशांसाठी थंडगार आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे मंडळाचे आद्यकर्तव्य आहे. पिण्याच्या पाण्याच्या जागी प्रचंड अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे घाण पाणी पिऊन आजारी पडण्यापेक्षा प्रवासी खिशातील चार पैसे खर्च करून पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. कर्मचाऱ्यांवरही हीच वेळ येत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाणी विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
सुधारणा करावी
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक मनीष जोगदंडे म्हणाले, एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. उत्पन्नही चांगले मिळते. तरीही मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था वाईट झालेली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही; परंतु एसटी महामंडळाने बसस्थानकात सुधारणा केली पाहिजे.
छत कोसळण्याची भीती
मध्यवर्ती बसस्थानक बांधून अनेक वर्षे लोटली आहे. बसस्थानकाचे छत धोकादायक झाले आहे. हे छत कधीही कोसळू शकते,अशी माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी मुंबई कार्यालयास कळविली आहे; परंतु तरीही वेळीच खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली. वेळीच खबरदारी घेऊन बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम मार्गी लावण्याची गरज आहे. बसस्थानकाच्या उत्पन्नातून नूतनीकरण करावे,अशी मागणी होत आहे.