धर्मादाय रुग्णालयांना गरीब रुग्णांची ‘अ‍ॅलर्जी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 08:02 PM2020-08-26T20:02:32+5:302020-08-26T20:05:48+5:30

धर्मादाय रुग्णालयांना उपकरण खरेदीपासून जागेपर्यंत अनेक गोष्टींमध्ये शासनाकडून सवलती मिळतात.

Poor patients 'allergy' to charity hospitals | धर्मादाय रुग्णालयांना गरीब रुग्णांची ‘अ‍ॅलर्जी’

धर्मादाय रुग्णालयांना गरीब रुग्णांची ‘अ‍ॅलर्जी’

googlenewsNext
ठळक मुद्दे ३ महिन्यांत केवळ २९० रुग्णांवर मोफत उपचारया रुग्णालयांत १० टक्के खाटा या निर्धन रुग्णांसाठी,  तर १० टक्के खाटा या दुर्बल घटकांतील लोकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबादेतील धर्मादाय रुग्णालयांत निर्धन रुग्णांसाठी केवळ नावालाच खाटा राखीव ठेवण्यात येत आहेत. गोरगरीब रुग्णांसाठीच्या राखीव खाटा त्यांना उपलब्धच  करून दिल्या जात नसल्याची स्थिती आहे. गेल्या ३ महिन्यांत १९९ राखीव खाटांवर केवळ २९० निर्धन रुग्णांवर मोफत उपचार झाले. हीच परिस्थिती दुर्बल घटकातील रुग्णांच्या बाबतीतही पाहायला मिळत आहे.
धर्मादाय रुग्णालयांना उपकरण खरेदीपासून जागेपर्यंत अनेक गोष्टींमध्ये शासनाकडून सवलती मिळतात. या रुग्णालयांत १० टक्के खाटा या निर्धन रुग्णांसाठी,  तर १० टक्के खाटा या दुर्बल घटकांतील लोकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

नियमानुसार ८५ हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या निर्धन गटातील व्यक्तींवर या रुग्णालयात मोफत उपचार करणे सक्तीचे आहे, तसेच १ लाख ६० हजार रुपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्या दुर्बल घटकातील लोकांवर सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. यासाठी रुग्णाचे केशरी, पिवळे रेशनकार्ड व तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. यासाठी रुग्णालयांनी उत्पन्नातील दोन टक्के निधी जमा करून त्याचे स्वतंत्र खाते काढणे आवश्यक आहे. धर्मादाय रुग्णालयांनी या बाबींची पूर्तता केलेली आहे; परंतु प्रत्यक्षात उपचार झालेल्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे शेकडो रुग्ण मोफत आणि सवलतीच्या उपचारापासून वंचित राहतात. गरीब रुग्ण सरकारी रुग्णालयांच्याच पायऱ्या चढत असल्याची स्थिती आहे.

देखरेख समितीकडून तपासणी 
धर्मादाय रुग्णालयांत गरीब आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांची संख्या दर्शविणारी नोंदवही आहे किंवा नाही, केसपेपरमधील फॉर्म पूर्ण भरलेले आहेत किंवा नाही, एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत किंवा नाही, याची तपासणी देखरेख समितीने करणे बंधनकारक आहे. ही तपासणी नियमितपणे केली जाते, कोणत्याही रुग्णाची तक्रार प्राप्त नसल्याचे धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यालयातर्फे मार्च ते जून या तीन महिन्यांत धर्मादाय रुग्णालयांतील निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांवर झालेल्या उपचाराची माहिती देण्यात आली.


धर्मादाय की, पंचतारांकित रुग्णालय
शहरातील काही पंचतारांकित धर्मादाय रुग्णालये ही रुग्णालयाच्या फलकावर धर्मादाय अथवा चॅरिटेबल असा शब्द लिहीत नसल्यामुळे गरीब व गरजू रुग्ण तेथे जाण्याचे धाडसही करीत नाहीत. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये निर्धन रुग्णांना उपचाराचा लाभच मिळत नाही. धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे नोंद असलेल्या रुग्णालयांच्या नावांमध्ये धर्मादाय किंवा चॅरिटेबल हा शब्द असणे सक्तीचे आहे; परंतु त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. 


कठोर कारवाई करण्याची गरज
गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार वर्ग, घरगुती काम करणाऱ्या मोलकरणी, हमाल,  कष्टकरी, झोपडपट्टीमधील गरीब, गरजू लोकांना ही योजना माहीतच नाही. योजनेचा प्रचार व प्रसार केलेला नाही. रुग्णालयेदेखील दुर्लक्ष करतात. केवळ कागदोपत्री खर्च दाखविला जातो. निर्धन, दुर्बल रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांची तपासणी करून कठोर कारवाई केली पाहिजे. 
- सुनील कौसडीकर, सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. 

मार्च ते जून महिन्यातील परिस्थिती
२९० निर्धन रुग्णांवर ९ लाख ६४ हजार ७३१ रुपयांचे मोफत उपचार.
६३० दुर्बल घटकातील रुग्णांवर ३० लाख ७१ हजार ५६१ रुपयांचे सवलत उपचार.


औरंगाबादेतील एकूण धर्मादाय रुग्णालये -१९
एकूण खाटा -1966
निर्धन रुग्णांसाठी उपलब्ध खाटा - 199
दुर्बल घटकातील रुग्णांसाठी उपलब्ध खाटा - 197

खाटांची माहिती आॅनलाईन
धर्मादाय आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर धर्मादाय रुग्णालयात राखीव आणि उपलब्ध खाटा यांची प्रत्येक मिनिटाला माहिती उपलब्ध असते. मंगळवारी दुपारी निर्धन रुग्णांच्या राखीवपैकी ९० टक्के खाटा रिकाम्या असल्याचे पाहायला मिळाले. गेल्या तीन महिन्यांत उपचार झालेल्या रुग्णांची संख्याही अत्यल्प आहे. 

 

Web Title: Poor patients 'allergy' to charity hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.