सिडको नाट्यगृहाचे पीओपी छत कोसळले; दोन महिला बचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:33 AM2018-07-21T00:33:21+5:302018-07-21T00:35:31+5:30

सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिराच्या व्हरांड्यातील पीओपीचे छत शुक्रवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. छत कोसळत असताना काही अंतरावरच असणाऱ्या दोन महिला बालंबाल बचावल्या.

POP roof of CIDCO drama collapses; Two women rescue | सिडको नाट्यगृहाचे पीओपी छत कोसळले; दोन महिला बचावल्या

सिडको नाट्यगृहाचे पीओपी छत कोसळले; दोन महिला बचावल्या

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद मनपाचे दुर्लक्ष : धोकादायक छत काढण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिराच्या व्हरांड्यातील पीओपीचे छत शुक्रवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. छत कोसळत असताना काही अंतरावरच असणाऱ्या दोन महिला बालंबाल बचावल्या.
म्हाडाच्या सदनिकांच्या सोडतीचा कार्यक्रम नाट्यमंदिरात चालू होता. लाभार्थींच्या नावाची यादी व्हरांड्यात लावण्यात आली होती. ही यादी पाहण्यासाठी नागरिकांची व्हरांड्यात गर्दी झाली होती. व्हरांड्यात काही टेबल, खुर्च्याही मांडण्यात आल्या होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास व्हरांड्यातील पीओपीचे छत अचानक कोसळले. छताला असलेला लोखंडी बार आणि घट्ट झालेले प्लास्टिक आॅफ पॅरीस खाली आले. छत कोसळल्याच्या ठिकाणापासून अगदी दोन ते तीन मीटरच्या अंतरावर एका टेबलसमोर दोन महिला कागदपत्रे भरून घेण्यासाठी उभ्या होत्या. छत कोसळल्याचा आवाज ऐकून त्या बाजूला धावल्या. त्यामुळे त्यांना इजा झाली नाही. छत कोसळ्ल्याचा आवाज ऐकून नाट्यगृहाच्या आतील नागरिकही बाहेर आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी नाट्यगृहातील आणि व्हरांड्यातील छताची पाहणी करून मनपाच्या अभियंत्याला बोलावून घेतले. या छताची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून त्वरित अहवाल द्यावा, तसेच छत धोकादायक बनले असल्यास ते काढून टाकण्याची सूचनादेखील त्यांनी यावेळी केली.
नाट्यगृहातील छत पडल्याची रीतसर नोंद घेऊन त्याची एक तक्रारदेखील स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याच्या सूचना मनपाच्या वॉर्ड अभियंत्याला देण्यात आल्या.
म्हाडाच्या अधिकाºयांनी केल्या तक्रारी
नाट्यगृहाची अवस्था वाईट झाली असून, धोकादायक छत पडण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. अनेकदा या घटना घडल्या असतानादेखील त्याकडे अधिकाºयांनी दुर्लक्ष का करावे. गर्दीत छत कोसळले असते तर मोठा अनर्थ झाला असता. म्हाडाच्या सोडतीला वेगळेच वळण लागले असते, अशी भीती अधिकाºयांनी व्यक्त केली.
दुरुस्तीची मागणी
नाट्यगृह निर्माणापासून मनपाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने नाट्यगृहाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. सिडको परिसरात एकमेव हे मोठे नाट्यगृह असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: POP roof of CIDCO drama collapses; Two women rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.