५८ लाख नागरिकांची पाण्यासाठी वणवण
By Admin | Published: May 24, 2016 12:55 AM2016-05-24T00:55:52+5:302016-05-24T01:23:12+5:30
औरंगाबाद : पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षीही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे. टँकरने पाणीपुरवठा हा एकमेव
औरंगाबाद : पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षीही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे. टँकरने पाणीपुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक राहिल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच ५८ लाख लोकांना ३६८१ टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. मेअखेरपर्यंत हा आकडा ४ हजारांपर्यंत जाण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६०० गावे, १८ लाख लोकसंख्या आणि ८०० टँकरची वाढ झाली आहे. यंदाचा दुष्काळ मागच्या वर्षीच्या तुलनेत भयावह असल्याचे आकड्यांवरून दिसते.
पारा ४२ डिग्रीसेल्सियसच्या पुढे-मागे सरकत असल्यामुळे पाण्याचे साठे आटू लागले आहेत. मराठवाड्यातील सुमारे ५८ लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. २ हजार ८४९ गावांना ३६८१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १३३ गावे आणि १६७ टँकर वाढले आहेत. वैशाख महिना सरतो आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वणवण करावी लागणार हे निश्चित आहे.
विभागातील २९२१ गावांना टँकरचे पाणी पुरविले जात असून नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. १९२५ गावांसाठी ७४५६ विहिरी विभागीय प्रशासनाच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. मेच्या तिसऱ्या आठवड्यातच ६०० गावे नव्याने दुष्काळाच्या गर्तेत आली आहेत. गेल्या महिन्यात २ हजार ६० गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. सद्य:स्थितीत २८४९ गावांत टँकरचे पाणी दिले जात आहे. वाढलेल्या गावांतील १२ लाख लोकसंख्येची त्यात भर पडली आहे. ५९३ टँकर वाढले आहेत.