पोस्को गुन्ह्यात मदतीसाठी २० हजार मागितले; पोलीस उपनिरीक्षक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 06:33 PM2021-03-03T18:33:18+5:302021-03-03T18:34:31+5:30
Sub-Inspector of Police arrested in Bribe case पिशोर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीस तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळालेला आहे.
औरंगाबाद : पिशोर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रणजित गंगाधर कासले यांना २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यानंतर अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने केली.
पिशोर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीस तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. यासंदर्भात तपासिक अधिकाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. तपासिक अधिकारी कासले यांनी तक्रारदाराला पूरक बाजू कोर्टात सादर करण्यासाठी २५ फेब्रुवारीला २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. मंगळवारी पिशोर येथे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे सिद्ध झाले. यानंतर उपनिरीक्षक रणजित कासले यांना अटक करण्यात आली होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश धोक्रट, जमादार गणेश पंडुरे, पोलीस अंमलदार सुनील पाटील, अशोक नागरगोजे, चालक देवसिंग ठाकूर आदींच्या पथकाने केली.