सकारात्मक! ऑरिकला मिळाला विद्युत वितरणाचा परवाना; उद्योगांना मिळणार स्वस्त वीज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 04:10 PM2022-03-26T16:10:35+5:302022-03-26T17:44:43+5:30
देशभरात जेथे स्वस्त वीज मिळेल, तेथून ती खरेदी केली जाईल व इथल्या उद्योगांना सध्याच्या दरापेक्षा निश्चितच कमी दराने ती वितरित केली जाईल.
औरंगाबाद : महाराष्ट्रातील अन्य औद्योगिक क्षेत्रांपैकी ‘ऑरिक’ला वीज वितरणाचा पहिला परवाना मिळाला आहे. यामाध्यमातून ऑरिक टाऊनशीप आता स्वस्त वीज खरेदी करून ती उद्योगांना कमी दरात वितरित करेल. ज्यामुळे ‘डीएमआयसी’मध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना तसेच आहेत त्या उद्योगांसाठी ही सकारात्मक बाब ठरेल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
शनिवारी औरंगाबादेत शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील ऑरिक सिटीच्या प्रशासकीय कार्यालयात ‘औरा ऑफ ऑरिक’ या ‘विदेशी गुंतवणूक व पर्यटन संधी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत विविध १० देशांचे वाणिज्य राजदूत सहभागी झाले होते. त्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, ‘डीएमआयसी’ अंतर्गत ऑरिक सिटीला वीज वितरणाचा परवाना मिळाला आहे. आता त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या परिसरातील महावितरणच्या नेटवर्कचा वापर करून उद्योगांना वीज वितरण करण्यात येईल. देशभरात जेथे स्वस्त वीज मिळेल, तेथून ती खरेदी केली जाईल व इथल्या उद्योगांना सध्याच्या दरापेक्षा निश्चितच कमी दराने ती वितरित केली जाईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत शेजारच्या राज्यात स्वस्त वीज मिळते, ही उद्योगांची ओरड यापुढे राहणार नाही.
‘डीएमआयसी’ लवकरच मोठी गुंतवणूक होईल
‘औरा ऑफ ऑरिक’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे चांगले फलीत येईल. विविध देशांच्या वाणिज्य राजदुतांना औरंगाबाद शहर, औद्योगिक क्षेत्रातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा व दळणवळणाच्या सुविधांची माहिती देण्यात आली. ‘सीआयआय’, ‘सीएमआयए’, ‘मासिआ’चे पदाधिकारी, काही उद्योगांचे वरिष्ठ अधिकारी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी इथल्या सकारात्मक बाबींची माहिती दिली, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.
महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही
सुभाष देसाई म्हणाले की, कोरोना काळात लॉकडाऊन होते, तरी महाराष्ट्र थांबला नाही, थांबणारही नाही. या काळात गुंतवणुकीसंबंधीचे ३ लाख कोटींचे करार केले. आतापर्यंत त्यातील ७० प्रकल्पांना भूखंड वाटप केले. या माध्यमातून ३ लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे.