ग्राहकांची केविलवाणी वणवण !

By Admin | Published: November 14, 2016 12:24 AM2016-11-14T00:24:53+5:302016-11-14T00:22:09+5:30

उस्मानाबाद : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यापासून उस्मानाबादकरांना पैशासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे.

The positive statement of the customer! | ग्राहकांची केविलवाणी वणवण !

ग्राहकांची केविलवाणी वणवण !

googlenewsNext

उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यापासून ते आजतागायत उस्मानाबादकरांना पैशासाठी केविलवाणी धडपड करावी लागत असल्याचे चित्र शहरामध्ये पाहावयास मिळत आहे. सुटीच्या दिवशीही म्हणजेच रविवारी बँका सुरु ठेवण्यात आल्या. त्यामुळे बहुतांश बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी तसेच बदलण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसू लागली. असे असताना दुसरीकडे शहरातील थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६० टक्क्यांपेक्षा अधिक एटीएमचे शटर डाऊन होते. त्यामुळे ज्या एटीएममध्ये पैसे होते तेथे ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.
चलनामधून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खिशात पैसे असूनही खर्च करता येत नसल्याचे चित्र आहे. ग्राहकांची गैरसोय कमी करण्यासाठी शासनाने सुटीच्या दिवशी म्हणजेच रविवारीही बँका सुरु ठेवण्याबाबत फर्मान काढले होते. त्यानुसार आज शहरातील सर्व बँकांचे कामकाज सुरु होते. त्यामुळे शहरातील राष्ट्रीयकृत बँकासह खाजगी बँकामध्येही ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. कोणी नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभा होते तर कोणी पैसे खात्यावर जमा करण्यासाठी आले होते. गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने ग्राहकांना तासन्तास रांगेत थांबावे लागले.
दरम्यान, एटीएमद्वारे प्रतिदिन दोन हजार रुपये काढता येणार आहेत. तसे शासनाकडूनही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे बँकांतील गर्दी पाहून थोड्याफार पैशांची गरज असणारे ग्राहक एटीएम गाठत आहेत. परंतु एटीएममधील चित्रही फारसे दिलासादायक नाही. शहरामध्ये राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांसह काही मल्टीस्टेट बँकांचे एटीएम आहेत. या एटीएमपैकी रविवारी जवळपास ६० टक्क्यापेक्षा अधिक एटीएमचे शटर डाऊन होते. काळामारुती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बँक आॅफ बडोदा शाखेचे एटीएम आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास सदरील एटीएमचे शटर बंद असल्याचे दिसून आले. हा परिसर मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. सदरील एटीएम सेवा बंद असल्याने नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांनाही मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागत असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. या एटीएमपासून काही अंतरावर असलेल्या मारवाडी गल्लीतील महाराष्ट्र बँकेचे एटीएमही बंद अवस्थेत होते. त्यामुळे अनेक ग्राहकांना याचा फटका सोवावा लागला. बँक आॅफ इंडियाने याच भागात एटीएम सुरु केलेले आहे. मात्र याही एटीएमचे शटर डाऊन असल्याचे दिसून आले. एकूणच मुख्य बाजारपेठ असलेल्या या परिसरातील तिन्ही बँकांची एटीएम सेवा बंद ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता.
दरम्यान, बार्शी नाका परिसरातही विविध तीन बँकांकडून एटीएम सेवा पुरविली जाते. परंतु दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास या तीनपैकी केवळ अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम सुरु होते. त्यामुळे ग्राहकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात होती. रांग रस्त्यापर्यंत येऊन ठेपली होती. सेंट्रल बिल्डींग चौकासह बार्शी नाक्यावरही बहुतांश बँकांचे एटीएम आहेत. परंतु एक दोन एटीएम वगळता इतर एटीएमचे शटर डाऊन असल्याचे पहावयास मिळाले. बँक आॅफ इंडियाचे एटीएम तर सकाळपासूनच बंद असल्याचे उपस्थित नागरिकांतून सांगण्यात आले. आयसीआयसीआय बँकेची एटीएम सेवा सुरु होती. यासोबतच अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएमसमोरही भली मोठी रांग लागल्याचे पहावयास मिळाले. पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम सुरु असल्याने येथेही ग्राहकांची गर्दी प्रकर्षाने दिसून आली.
दरम्यान, भानुनगर परिसरात महाराष्ट्र बँकेला लागूनच एटीएम आहे. पैसे काढण्यासाठी अनेक ग्राहक येथे येत होते. परंतु शटर बंद असल्याचे पाहून ग्राहकांना परतावे लागत होते. काही ग्राहक बँकेच्या कर्मचाऱ्याकडे विचारणा करत होते. परंतु त्यांच्याकडूनही अपेक्षीत उत्तरे मिळत नव्हती. परिणामी संबंधित ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात होता. जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास लागून असलेल्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद बँक परिसरातही ग्राहकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. विशेष म्हणजे या बँक परिसरात असलेले सर्व एटीएम सुरु होते. बसस्थानक परिसरातही विविध बँकांचे एटीएम आहेत. येथे सातत्याने ग्राहकांची वर्दळ असते. परंतु ऐन अडचणीच्या काळात या ठिकाणचे केवळ आयसीआयसीआय या बँकेचेच एटीएम सुरु होते. भारतीय स्टेट बँकेचे एटीएम बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. शिवाजी चौकातही अ‍ॅक्सिस बँकेसोबत बँक आॅफ इंडियाचेही एटीएम आहे. विशेष म्हणजे दुपारच्या सुमारास उपरोक्त दोन्हीही एटीएम बंद अवस्थेत होते. त्यामुळे उपस्थित ग्राहकांतून नाराजी व्यक्त होताना दिसून आली. समतानगर परिसरातही जवळपास तीन एटीएम आहेत.
यापैकी एचडीएफसी बँकेचे एटीएम दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरु होते. याठिकाणी ग्राहकांची लांब लचक रांग लागल्याचे पहावयास मिळाले. तर स्टेट बँकेची दोन्ही एटीएम बंद होते. एकूणच शहरातील विविध बँकांची एटीएम संख्या लक्षात घेता जवळपास ६० टक्क्यावर एटीएम दुपारच्या सुमारास बंद होते. त्यामुळे ग्राहक पैशासाठी एटीएमचे उंबरठे झिजवताना दिसून आले. दरम्यान, ग्रामीण भागात तर याहीपेक्षा विदारक परिस्थिती आहे. बँका तसेच एटीएमची संख्या कमी असल्याने ग्राहक तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन एटीएममधून पैसे काढताना दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The positive statement of the customer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.