इंग्लिश स्कूलची जागा ताब्यात
By Admin | Published: June 29, 2014 11:43 PM2014-06-29T23:43:00+5:302014-06-30T00:36:59+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूलच्या जागेचा गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जागेची मोजणी होऊन नकाशा तयार करण्यात आला
विठ्ठल भिसे, पाथरी
शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूलच्या जागेचा गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जागेची मोजणी होऊन नकाशा तयार करण्यात आला आणि त्यानंतर ही जागा शिक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे शाळेची इमारत आणि १०० मुलींचे वसतिगृह येत्या वर्षभरात उभे केले जाणार आहे.
केंद्र शासनाने ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाची विद्यार्थ्यांना गोडी लागावी यासाठी नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर राज्यामध्ये मॉडेल इंग्लिश स्कूल सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम दोन वर्षांपूर्वी घेतला. सहावीच्या वर्गापासून या शाळा प्रत्येक तालुकास्तरावर सुरू झाल्या. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळांमधून देण्यात येणार असल्याने पालकांचा लोंढाही या शाळेकडे होता. शाळा सुरू करतानाच मॉडेल इंग्लिश स्कूलसाठी स्वतंत्र इमारत, १०० मुलींचे वसतिगृह यासाठी शासनाकडून तरतूद करण्यात आली. इमारत उभी करण्यापूर्वी या शाळा तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुरू करण्यात आल्या.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत या शाळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे येथे उपकार्यालय सुरू करण्यात आले. तर तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली या शाळेवर देखरेख करण्यासाठी समित्या नेमण्यात आल्या आहेत. पाथरी येथे ही शाळा दोन वर्षांपूर्वी सुरू झाल्यानंतर शाळेच्या बांधकामासाठी जागेचा शोधही सुरू झाला. शहरातील सर्वे नं. ६७, बोरगव्हाण शिवारातील जायकवाडीची जागा या शाळेच्या इमारतीसाठी घेण्याचे प्रयत्न झाले. परंतु यामध्ये अडचणी निर्माण झाल्याने शाळेच्या जागेचा प्रश्न रखडून पडला होता.
मागील सहा महिन्यांपूर्वी पोहेटाकळी शिवारात जायकवाडीची जागा महसूल विभागाने शासनाच्या नावे करून घेतली. त्यानंतर याच जागेतील पाच एकर जागेमध्ये मॉडेल इंग्लिश स्कूलची इमारत बांधण्याचा प्रस्ताव तहसीलदारांंनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. या प्रस्तावानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूमिअभिलेख कार्यालयाला जमीन मोजून नकाशा तयार करण्याबाबतचे आदेशही काढले होते. त्यानुसार भूमीअभिलेख कार्यालयाने सर्वे नं. ८३ मधील ५ एकर जमीन मोजून तिचा नकाशा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव सादर केला होता. या आलेल्या प्रस्तावानंतर जागेचा नकाशा आणि जमीन ताब्यात घेण्याबाबतची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. यामुळे दोन वर्षांपासून रखडलेला मॉडेल इंग्लिश स्कूलच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
नवीन जागेमध्ये शाळेचे स्थलांतर
येथील मॉडेल इंग्लिश स्कूल गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये भरविण्यात येत होती. या ठिकाणी सोयी-सुविधा नसल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही शाळा नवीन शाळेमध्ये स्थलांतरित करण्याबाबतचा ठराव घेतला होता.माध्यमिक शिक्षण विभागाच्या परवानगीने अखेर मॉडेल इंग्लिश स्कूल नवीन शाळेमध्ये स्थलांतरित करून वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
वसतिगृहही उभारणार
मॉडेल इंग्लिश स्कूलसाठी सर्व सोयीयुक्त इमारत उभारण्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर या शाळेच्या परिसरात १०० मुलींचे वसतिगृह बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जागेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, पुणे यांच्याकडे सादर केला जाणार आहे.