निर्जनस्थळी फिरणारे प्रेमीयुगुल दामिनी पथकाच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:02 AM2021-09-19T04:02:57+5:302021-09-19T04:02:57+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील निर्जनस्थळी फिरत असलेल्या २५ ते ३० प्रेमीयुगुलांसह टवाळखोरांना दामिनी पथकाने ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील निर्जनस्थळी फिरत असलेल्या २५ ते ३० प्रेमीयुगुलांसह टवाळखोरांना दामिनी पथकाने पकडले. या युगुलांच्या ओळखीसाठी कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर संबंधितांच्या नातेवाइकांना त्यांच्या कारनाम्यांची माहिती देत त्यांना तंबी देऊन सोडून देण्यात आले. पकडलेल्यांमध्ये एकही अल्पवयीन नव्हते.
विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल, बुद्ध लेणी, बुद्ध विहार परिसर, हनुमान टेकडी, पहाडसिंगपुरा या परिसरात निर्जनस्थळी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, पोलीस हवालदार लता जाधव, आशा गायकवाड, नेहा वायभट यांचे पथक गस्त घालीत होते. निर्जन असलेल्या या भागात विविध २५ ते ३० जणांना पथकाने पकडले. यातील अनेकजण प्रेमीयुगुल होते, तर काहीजण टवाळखोर असल्याचेही पाहणीत दिसून आले. पथकाने प्रत्येकाचे ओळखपत्र पाहूनच त्यांना या भागात पुन्हा यायचे नाही, अशी तंबी दिली. तसेच मुलगा आणि मुलगी एकत्र सापडल्यास त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून संबंधितांच्या आई-वडिलांना त्यांच्या कारनाम्याची माहिती देण्यात आली. त्यानंतरच त्यांना सोडण्यात आले. तसेच सोनेरी महल येथील सुरक्षा रक्षकास परिसरात मुला-मुलींना या ठिकाणी बसू न देण्याच्या सूचनाही दामिनी पथकाने दिल्या आहेत.