६ कोटींच्या खरेदीप्रकरणी सरकारकडून चौकशीची शक्यता
By Admin | Published: May 31, 2016 12:07 AM2016-05-31T00:07:53+5:302016-05-31T00:38:28+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ६ कोटींच्या विनानिविदा सॉफ्टवेअर खरेदी प्रकरणात तसेच विद्यापीठातील वाढत्या आर्थिक अनियमिततेसंदर्भात
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ६ कोटींच्या विनानिविदा सॉफ्टवेअर खरेदी प्रकरणात तसेच विद्यापीठातील वाढत्या आर्थिक अनियमिततेसंदर्भात सरकारकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विद्यापीठातील ६ कोटींचा सॉफ्टवेअर खरेदीचा डाव उधळला गेल्यानंतर या प्रकरणात विद्यापीठातील ज्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, त्यासंबंधी चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. आमदार शिरसाट यांनी मागील सप्ताहात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेऊन ६ कोटींच्या निविदाप्रकरणी चर्चा केली होती. विद्यापीठातील प्राध्यापक आणि काही अधिकाऱ्यांची नियुक्ती ही नियमानुसार भरतीची जाहिरात देऊन करण्यात आली नसल्यासंबंधीही त्यांनी कुलगुरूंशी चर्चा केली होती. त्यानंतर या दोन्ही विषयासंदर्भात त्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठविले होते. आजीवन शिक्षण विभागात भरती केल्या जाणाऱ्या सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांच्या जाहिरातीत दिलेल्या अर्हतेवरही त्यांनी पत्रात आक्षेप घेतला आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनीही या सर्व प्रकरणात उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, आ. शिरसाट म्हणाले की, या सर्व विषयासंबंधी आपला पाठपुरावा चालू असून, वेळ पडल्यास विद्यापीठातील अनियमिततेचा विषय पावसाळी अधिवेशनातही उपस्थित करू. विविध संघटना तसेच राजकीय क्ष़ेत्रातील दबाव आणि विद्यापीठाची मलीन होत चाललेली प्रतिमा, यामुळे गेल्या काही दिवसांत चालू असलेल्या अनियमिततेसंदर्भात सरकारकडून चौकशीची शक्यता आहे.