बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता; संपर्कप्रमुखांसमोर केल्या अनेकांनी तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 12:06 PM2022-07-01T12:06:56+5:302022-07-01T12:07:18+5:30
शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असे युद्ध पेटल्याने महाविकास आघाडीचे सरकार गेले आहे. आता यामागे काय कारणे आहेत, याची मीमांसा करण्यासाठी पक्षीय पातळीवर कानोसा घेण्यात येत आहे.
औरंगाबाद: राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाली. महाविकास आघाडीचे सरकार पडले. सरकारच्या विरोधात गेलेल्या गटात जिल्ह्यात पाच आमदारांचा समावेश असल्याने शिवसेना बालेकिल्ला ढासळला आहे. बालेकिल्ल्याचे वैभव पन्हा मिळविण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना संघटनेत फेरबदल करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्याकडे केल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून समजली आहे.
माजी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी कधीही संपर्क ठेवला नाही. सनदी अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांनी संघटनेला हाताळले. त्यामुळे येथील शिवसेनेला घरघर लागण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याची कैफियत पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. तसेच काही पदांवर दोन दशकांपासून तेच ते पदाधिकारी आहेत. त्यामुळे एकाधिकारशाही वाढल्याबाबत बंडखोर आमदारांनी बंडखोरी करण्यापूर्वी व नंतर पक्षप्रमुखांच्या कानावर घातले होते. परंतु त्यात काहीही बदल झाला नाही. यामुळेही आमदारांमध्ये वाढलेली खदखद बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यास कारणीभूत ठरली. उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख यांच्यातील अधिकारावरून देखील अनेक मतभेद आहेत. मनपा, जि. प. निवडणुकीच्या तोंडावर हा सगळा प्रकार झाल्याने फेरबदलाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असे युद्ध पेटल्याने महाविकास आघाडीचे सरकार गेले आहे. आता यामागे काय कारणे आहेत, याची मीमांसा करण्यासाठी पक्षीय पातळीवर कानोसा घेण्यात येत आहे. पालकमंत्री, जिल्हाप्रमुखांच्या एकाधिकारशाहीमुळे जिल्ह्यातील आमदार वैतागले होते, अशा तक्रारी काही बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या. यातून पक्ष काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या पंधरवड्यात शिवसेना आणि युवा सेनेत मोठे फेरबदल होतील. काहींची पक्षातून हकालपट्टी होईल, तर काही जणांना दुसऱ्या पदावर संधी मिळेल.