औरंगाबादमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता; रुग्ण उपचारासाठी घाटीला हवेत २१.६८ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:13 PM2020-11-21T13:13:28+5:302020-11-21T13:23:20+5:30
वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने नुकतीच बैठक घेऊन तयारीच्या सूचना घाटी प्रशासनाला दिल्या
औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानातून (एनएचएम) आतापर्यंत कोरोना रुग्ण उपचारासाठी निधी मिळाला. दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन पुढील कोरोना रुग्ण उपचार, औषधी, प्रयोगशाळा साहित्य आणि मनुष्यबळासाठी २१.६८ कोटींची निधी मागणी सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांच्याकडे करण्यात आली आहे. मार्च पर्यंतचा खर्च लक्षात घेऊन नव्याने नियोजन कृती आराखडा सादर केला असल्याची माहिती डाॅ. कानन येळीकर यांनी दिली.
कंत्राटी पदे, ऑक्सिजन, औषधी, सर्जिकल साहित्य, प्रयोगशाळेतील कन्झ्युमेबल आदींचा सुक्ष्म नियोजन कृती आराखडा (पीआयपी) घाटीचे उपाधिष्ठाता डाॅ. भारत सोनवणे यांनी सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांची भेट घेऊन ९ सप्टेंबरला सादर केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी डाॅ. मुंडे यांनी पत्राद्वारे घाटीला नव्याने पीआयपी सादर करण्याच्या सुचविले होते.
यासंदर्भात डाॅ. गोंदवले म्हणाले, या मागणीचा राज्य स्तरावर निर्णय होणार असून, नव्याने पीआयपी मागविण्यात आले होते. ते आरोग्य सेवा संचालनालयाकडे सादर करण्यात आले आहेत. मागणीमध्ये कपात होऊन दरवर्षी अर्थसंकल्पात घाटीसाठी तरतूद होते. त्यामुळे रुग्णसेवेवर त्याचा परिणाम जाणवतो. औषधी तुटवडा, यंत्रसामुग्रीची दुरुस्ती रेंगाळते. येत्या राज्य अर्थसंकल्प आणि अधिवेशनातील पुरवणी मागणीसाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने नुकतीच बैठक घेऊन तयारीच्या सूचना घाटी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नाॅन कोविड रुग्ण उपचार, वैद्यकीय महाविद्यालयाच्या खर्चासाठी निधीच्या मागणीचे नियोजन सध्या सुरु असल्याचे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी सांगितले.
घाटी रुग्णालयाने केलेल्या मागणीचा निर्णय राज्य स्तरावर निर्णय होणार असून, नव्याने पीआयपी मागविण्यात आले होते. ते आरोग्य सेवा संचालनालयाकडे सादर करण्यात आले आहेत.
- डाॅ. मंगेश गोंदावले, सीईओ, जिल्हा परिषद