स्तनकर्करोगात अवयव वाचविणे झाले शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:06 AM2017-11-13T00:06:57+5:302017-11-13T00:07:25+5:30
स्तनाचा कर्क रोग हा एक मोठा आजार असून या आजारात स्तन वाचवणे शक्य आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जगभरामध्ये स्तनाचा कर्क रोग हा एक मोठा आजार असून, याचे निदान झाले की शस्त्रक्रिया करून ते काढून टाकण्यावर भर दिला जातो. भारतात ७० टक्के रुग्ण हा अवयव काढून टाकण्याचीच विनंती करतात; मात्र या आजारात स्तन वाचवणे शक्य आहे आणि ते १०० टक्के सुरक्षित आहे, असे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ डॉ. संकरण नारायणन म्हणाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शल्यचिकित्साशास्त्र विभाग, मेडिकल रिसर्च इंडिया, असोसिएशन आॅफ ब्रेस्ट सर्जन्स आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १२) घाटीत आयोजित परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. मिहीर चंदराणा, डॉ. विजय बोरगावकर, डॉ. अरुणा कराड, डॉ. राजेश सावजी, डॉ. अजय बोराळकर, डॉ. अनंत बीडकर, डॉ. उज्ज्वला दहीफळे, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. प्रवीण वासाडीकर, डॉ. जुनैद शेख, डॉ. राजश्री पुरोहित, डॉ. सुरेश हरबडे आदींची उपस्थिती होती.
डॉ. नारायणन म्हणाले, भारतात स्तन कर्क रोगाबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. परदेशात ठराविक वयानंतर प्रत्येक महिलेची तपासणी केली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या भारतात हे शक्य नाही; परंतु डॉक्टरांनी या आजाराची लक्षणे आणि विशिष्ट परिस्थितीबद्दल जनजागृती केली पाहिजे. डॉ. चंदराणा म्हणाले, कर्क रोगाची फक्त ५० टक्के कारणे आपल्याला अवगत आहेत. उर्वरित ५० टक्के आपल्याला अजूनही अवगत नाहीत.