पदव्युत्तर ‘सीईटी’चा उडाला बोजवारा

By Admin | Published: July 11, 2017 12:26 AM2017-07-11T00:26:41+5:302017-07-11T00:29:18+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशासाठी पहिल्यांदाच घेतलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा (सीईटी) नियोजनशून्यतेमुळे सोमवारी बोजवारा उडाला.

Post-graduate 'CET' flown up | पदव्युत्तर ‘सीईटी’चा उडाला बोजवारा

पदव्युत्तर ‘सीईटी’चा उडाला बोजवारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशासाठी पहिल्यांदाच घेतलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा (सीईटी) नियोजनशून्यतेमुळे सोमवारी बोजवारा उडाला. ‘सीईटी’च्या मूळ धोरणालाच हरताळ फासत विषयांनुसार नव्हे तर कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्याशाखेनिहाय परीक्षा घेतली असल्याचे स्पष्ट झाले. या गोंधळामुळे विधि, पत्रकारिता, मानसशास्त्रांसह इतर अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग, उस्मानाबाद उपकेंद्र आणि संलग्न १२७ महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सुरुवातीपासूनच ही सीईटी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आॅनलाइन सीईटी घेण्यासाठी ‘वुई शाईन’ या कंपनीला १ कोटी रुपयांचे टेंडरही देण्यात आले होते. या निर्णयाला सर्व स्तरातून प्रखर विरोध झाल्यामुळे हा निर्णय बदलावा लागला. शेवटी आॅफलाइन सीईटी घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. यातही अनेक चुका असल्याचे समोर आले. या चुका दुरुस्त न करण्यात आल्यामुळे ऐन परीक्षेच्या दिवशीच काही विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागली. देशभरात विविध अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात येते. त्यात ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या विषयाची सीईटी होते. मात्र विद्यापीठाने अजबच कारभार केल्याचे दिसत आहे.
विद्यार्थ्याला ज्या विषयासाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्याचा पर्यायच आॅनलाइन परीक्षा नोंदणी करताना ठेवला नाही. यामुळे बी. ए. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या प्रवेशसाठीही सामाजिकशास्त्र विषयाची परीक्षा द्यावी लागली आहे. बी.कॉम. झालेल्या विद्यार्थ्यांना विधि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यांनाही एम.कॉम.ची सीईटी द्यावी लागली. यामुळे मुळातच सीईटीचे धोरण चुकले असल्याचे या प्रकारांवरून स्पष्ट झाले. विद्यापीठाच्या या धोरणाविषयी विद्यार्थ्यांनीही तक्रारी केल्या.
दोन सत्रांत झाली परीक्षा
विद्यापीठातीलच संगणकशास्त्र विभागात असलेल्या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. त्याठिकाणी प्रश्नपत्रिका कमी पडल्यामुळे ११ ते १ आणि १ ते ३ अशा दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. मात्र विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे हा गोंधळ झाल्याचा दावा केला. शहरातील मौलाना आझाद, छत्रपती महाविद्यालय आदी ठिकाणीही विद्यार्थी गोंधळातच होते. पुरातत्वशास्त्र विषयाची तर प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली नसल्याचे समजते.

Web Title: Post-graduate 'CET' flown up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.